Tue, Jul 07, 2020 07:12होमपेज › Sports › रायडूबाबत पक्षपात केला नाही : प्रसाद 

रायडूबाबत पक्षपात केला नाही : प्रसाद 

Published On: Jul 21 2019 11:36PM | Last Updated: Jul 21 2019 11:36PM
मुंबई : क्रीडा प्रतिनिधी 

भारताच्या विश्‍वचषक संघामध्ये स्थान न मिळालेल्या अम्बाती रायडूने तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली; पण संघात न घेण्याच्या आपल्या निर्णयाचा बचाव करीत प्रसाद यांनी आपल्या समितीने रायडूबाबत कोणताही पक्षपातीपणा केलेला नाही, असे स्पष्ट केले.

रायडूला जानेवारीपर्यंत भारताचा चौथ्या क्रमांकाचा फलंदाज समजले जात होते. मात्र, तरीही त्याला विश्‍वचषक स्पर्धेत स्थान मिळाले नाही. त्याच्या जागी तमीळनाडूचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला स्थान देण्यात आले. यावर प्रसाद यांनी तो त्रिआयामी (थ्रीडी) खेळाडू अशी टिप्पणी केली होती. यानंतर रायडूने व्यंगात्मक ट्विट करीत आपण विश्‍वचषक पाहण्यासाठी त्रिआयामी (थ्रीडी) चष्मे मागविले असल्याचे म्हटले. यामध्ये निवड समितीला निशाण्यावर ठेवण्यात आले होते व त्यामुळेच कदाचित दुखापतग्रस्त खेळाडूच्या जागी ऋषभ पंत व मयंक अग्रवालला संघात स्थान देण्यात आले.

प्रसाद यांना रायडूच्या ट्विटबाबत विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले. हे खूप चांगले ट्विट होते व योग्य वेळी हे ट्विट केले गेले होते. मी त्या ट्विटचा आनंद घेतला. मला माहीत नाही हा विचार त्याला कसा आला. रायडू ज्या भावनेत होता त्याच्या भावनेतून निवड समिती गेली होती. जेव्हा आम्ही कोणत्याही खेळाडूची निवड करतो तेव्हा त्याने चांगली कामगिरी केल्यास आम्हाला आनंद होतो. जेव्हा कोणाची निवड होत नाही तेव्हा निवड समितीला देखील वाईट वाटते; पण जे निर्णय घेण्यात आले त्यामध्ये कुठलाच पक्षपातीपणा नव्हता. आम्ही विजय शंकर, ऋषभ पंत किंवा मयंक अग्रवाल यांची निवड केली, असे प्रसाद म्हणाले.

रायडूला त्याच्या टी-20 कामगिरीवर एकदिवसीय संघात स्थान देण्यात आले तेव्हा खूप टीका झाली. यानंतर त्याला एका महिन्याच्या फिटनेस कार्यक्रमांतर्गत ठेवण्यात आले. म्हणजे त्याला फिट राहता येईल, असे प्रसाद यांनी उदाहरण देताना सांगितले. पंत व अग्रवाल यांना रायडूच्यावर का संधी देण्यात आली. यावर बोलताना प्रसाद म्हणाले की, संघ व्यवस्थापनाने डावखुर्‍या फलंदाजाची मागणी केली आणि आमच्याकडे ऋषभ पंतशिवाय कोणाताही पर्याय नव्हता. तो सक्षम आहे हे आम्हाला माहीत होते. त्यामुळे डावखुर्‍या फलंदाजाची निवड करण्यात आली.सलामीसाठी मधल्या क्रमातील फलंदाजाची निवड का करण्यात आली, असे अनेकजण विचार करीत होते.