Thu, Aug 22, 2019 14:35होमपेज › Sports › वर्ल्डकपमध्ये कोहलीला मिळेल दोन दिग्गजांची साथ : गांगुली

वर्ल्डकपमध्ये कोहलीला मिळेल दोन दिग्गजांची साथ : गांगुली

Published On: May 16 2019 1:59AM | Last Updated: May 17 2019 1:47AM
कोलकाता ः वृत्तसंस्था

‘2019 च्या आयपीएल’मध्ये कर्णधार म्हणून विराट कोहलीची कामगिरी समाधानकारक झाली नसल्याने त्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेबाबत प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहेत. यासंदर्भात अनेकांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. आता याबाबत टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही टिप्पणी केली आहे. 

गांगुली म्हणाला की, कोहलीच्या आयपीएलमधील कर्णधारपदाचा परिणाम वर्ल्डकपवर होणार नाही. कारण, वन-डेत कर्णधार म्हणून विराटचे रेकॉर्ड अत्यंत चांगले असून, ते वर्ल्डकपमध्येही तो कायम ठेवेल, याचा मला विश्‍वास वाटतो. 

गांगुली पुढे म्हणाला की, विराट हा खरोखरच नशीबवान आहे. कारण, त्याच्या संघात दोन यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा आहेत. वर्ल्डकपमध्ये या दोघांची कोहलीला चांगली साथ मिळेल. तरीही आयपीएलमधील कर्णधार म्हणून कामगिरी आणि वन-डे कर्णधार यांच्यात तुलना करण्यात येऊ नये. वन-डे क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून त्याने शानदार कामगिरी केली आहे. संघात सध्या उपकर्णधार म्हणून रोहित शर्मा आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने चौथ्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली आहे. तसेच, प्रचंड अनुभव असलेला महेंद्रसिंग धोनीही आहे. या दोन दिग्गज खेळाडूंची वर्ल्डकपमध्ये कोहलीला चांगली साथ मिळेल. हे संघासाठी महत्त्वाचे ठरेल. 

पंड्याचा फॉर्म संघासाठी महत्त्वाचा

इंग्लंडमध्ये 30 मेपासून सुरू होणार्‍या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा हार्दिक पंड्या महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल, असे सांगून गांगुली म्हणाला की, पंड्या सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. संघासाठी हे महत्त्वाचे आहे. माझ्या मते, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड तसेच भारत आणि पाकिस्तान हे संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील.