Tue, Oct 24, 2017 16:59
29°C
  Breaking News  

होमपेज › Sports › धवनचे खणखणीत शतक

धवनचे खणखणीत शतक

Published On: Aug 13 2017 2:07AM | Last Updated: Aug 13 2017 12:28AM

बुकमार्क करा
 कोहलीच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ ने श्रीलंकेविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने सहज खिशात घातले आहेत

परदेशात 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ देणारा पहिला भारतीय संघ होण्याची संधी चालून आली आहे.

‘टीम इंडिया’ने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे


कॅन्डी : वृत्तसंस्था

तिसर्‍या आणि अखेरच्या कसोटीतही भारताने पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे दमदार सुरुवात केली. आघाडीचे फलंदाज शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. परंतु, ते तंबूत परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली (42), चेतेश्‍वर पुजारा (8) आणि अजिंक्य रहाणे (17) लवकर बाद झाले. त्यामुळे धास्तावलेल्या श्रीलंकन गोलंदाजांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या 6 बाद 329 धावा झाल्या. आर. अश्‍विन तंबूत परतणारा अखेरचा फलंदाज ठरला. त्याला (31) धावांवर फर्नांडोने डिकवेलाकरवी झेलबाद केले. वृद्धिमान साहा नाबाद (13) आणि हार्दिक पांड्या नाबाद (1) ही जोडी खेळपट्टीवर आहे. 

आघाडीवीर शिखर धवनने जबरदस्त फलंदाजी करत कसोटी कारकीर्दीतील सहावे शतक फटकावले. तर दुसर्‍या बाजूला के. एल. राहुलने सलग सातवे अर्धशतक नोंदवत नवा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र, तो शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. तो 85 धावांवर पुष्पकुमाराच्या गोलंदाजीवर करुणारत्नेच्या हाती झेल देऊन बाद झाला. धवनने (119) आणि राहुलने (85) धावा केल्या.  पुष्पकुमाराने तीन तर संदाकनने दोन बळी घेतले. 

सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंकेला धूळ चारणार्‍या ‘टीम इंडिया’कडे तिसराही कसोटी सामना जिंकत इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर असणार्‍या ‘टीम इंडिया’ ला श्रीलंकेविरुद्ध तिसर्‍या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवून परदेशात तीन सामन्यांच्या मालिकेत ‘व्हाईट वॉश’ करण्याची चांगली संधी चालून आली आहे. विराटच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ ने श्रीलंकेविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिले 2 सामने खिशात घातलेे आहेत. जर तिसर्‍या व अंतिम कसोटी सामन्यात भारतीय संघ विजयाची पुनरावृत्ती करण्यात यशस्वी ठरला, तर परदेशात 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ देणारा हा पहिला भारतीय संघ ठरेल.

 भारताने परदेशात आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध ‘क्लीन स्वीप’ची कामगिरी केली आहे. परंतु, त्या मालिकांमध्ये केवळ एक किंवा दोन मर्यादित सामने होते. भारताने 2000 मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत 1-0 , तर 2004 व 2010मध्ये 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पराभव केला होता.

भारताने ऑस्ट्रेलियाचा चार सामन्यांच्या मालिकेत 4-0 ने पराभव केला  होता. मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने 1993-94 मध्ये इंग्लंड व श्रीलंकाविरुद्ध 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत ‘क्लीन स्वीप’ची नोंद केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध याची पुनरावृत्ती केली होती.

भारत : शिखर धवन झे. चांडिमल, गो. पुष्पकुमारा 119, के. एल. राहुल झे. करुणारत्ने, गो. पुष्पकुमारा 85, चेतेश्‍वर पुजारा, झे. मॅथ्यूज, गो. संदाकन 8, विराट कोहली झे. करुणारत्ने, गो. संदाकन 42, अजिंक्य रहाणे त्रिफळाबाद पुष्पकुमारा 17, रविचंद्रन आश्‍विन झे. डिकवेला, गो. फर्नांडो 31, साहा नाबाद 13, हार्दिक पांड्या नाबाद 1. एकूण 6 बाद 329
विकेट : 1-188, 2-219, 3-329, 4-264, 5-296, 6-322
गोलंदाजी : फर्नांडो 19-2-68-1, कुमारा 15-1-67-0, करुणारत्ने 5-0-23-0, परेरा 8-1-36-0, संदाकन 25-2-84-2 , पुष्पकुमारा 18-2- 40-3,