Fri, Mar 22, 2019 23:51होमपेज › Sports › इंग्लंडविरुद्ध धोनीला आहे ‘या’ विक्रमांची संधी!

इंग्लंडविरुद्ध धोनीला आहे ‘या’ विक्रमांची संधी!

Published On: Jul 12 2018 2:32PM | Last Updated: Jul 12 2018 2:28PMनॉटिंगहॅम: पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला आज(गुरुवार)पासून सुरुवात होत आहे. टी-20 मालिकेपाठोपाठ वन-डे मालिका देखील जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. या मालिकेत भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याची नजर मात्र काही विक्रमांवर असेल. धोनीला या मालिकेत अनेक विक्रम करण्याची संधी आहे. जाणून घेऊयात कोणते आहेत ते विक्रम...

दस हजारी मनसबदार होण्याची संधी

धोनीने आतापर्यंत वन-डेत 9 हजार 967 धावा केल्या आहेत. 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला केवळ 33 धावांची गरज आहे. 318 वन-डे सामने  खेळणाऱ्या धोनीला पहिल्याच सामन्यात या विक्रमाला गवसणी घालण्याची संधी आहे. याआधी भारताकडून केवळ सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनीच हा विक्रम केला आहे. धोनीने हा विक्रम केल्यास भारताचा तो चौथा तर जगातील 12वा क्रिकेटपटू ठरेल. 

इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याची संधी

वन डेत 10 हजार धावा करण्याबरोबरच इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करण्याची धोनीला संधी आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध आतापर्यंत 1 हजार 425 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत युवराज सिंग 1 हजार 523 धावांसह पहिल्या स्थानावर तर सचिन तेंडुलकर 1 हजार 455 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. युवराज सिंगला मागे टाकण्यासाठी धोनीला 98 धावांची गरज आहे. 

300 कॅच पकडण्याची संधी

धोनीने विकेटकीपर म्हणून वन डेत आतापर्यंत 297 कॅच पकडले आहेत. 300 कॅच हा टप्पा पार करण्यासाठी त्याला केवळ 3 कॅचची गरज आहे. आतापर्यंत केवळ तिघा विकेटकीपरना वन डेत 300पेक्षा जास्त कॅच घेता आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट (417), दक्षिण आफ्रिकाचे मार्क बाऊचर (402) आणि श्रीलंकेचा कुमार संगकारा (383) यांचा समावेश आहे. वन डेत सर्वाधिक 107 स्टपिंग करण्याचा विक्रम धोनीच्याच नावावर आहे.