Thu, Mar 21, 2019 09:01होमपेज › Sports › टीम इंडियाने ४० व्या षटकातच २६९ धावांचे आव्हान केले पार

टीम इंडियाने ४० व्या षटकातच २६९ धावांचे आव्हान केले पार

Published On: Jul 12 2018 4:56PM | Last Updated: Jul 13 2018 12:23AMनॉटिंगहॅम : पुढारी ऑनलाईन 

इंग्लंडच्या २६९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दमदार फलंदाजी केली. सलामीवीर रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यातील सलग दुसरे शतक ठोकून भारताला विजय मिळवून दिला. त्याने ११४ चेंडूत नाबाद १३७ धावा केल्या. भारताने २६९ धावांचे लक्ष ४०.१ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयाबरोबर भारताने तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

इंग्लंडच्या २६९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने धडाकेबाज सुरुवात केली. पहिल्या सहा षटकात भारताने ५० धावा फलकावर लावल्या. त्यात शिखर धवनने ४० धावा केल्या होत्या. शिखरला ही धमाकेदार सुरुवात मोठ्या धावसंख्येत परिवर्तित करता आली नाही. तो ४० धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला विराट कोहली आणि रोहित शर्माने धावगती कायम राखली. आक्रमणाची धूरा रोहितने आपल्या हातात घेत इंग्लिश गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी १६७ धावांची दमदार भागिदारी रचली. दरम्यान, रोहितने इंग्लंड दौऱ्यातील आपले सलग दुसरे शतक साजरे केले. रोहित आणि विराट दोघेच भारताला विजय मिळवून देतील असे वाटत असताना विराट ७५ धावा करुन राशिदच्या गोलंदाजीवर संघाच्या २२६ धावा झालेल्या असताना बाद झाला. त्यानंतर रोहितने विजयाची औपचारिक्ता ४०.१ षटकात पूर्ण केली. इंग्लंडकडून मोईन अली आणि राशिदने प्रत्येकी एक बळी घेता. 

पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात   सर्वबाद २६८ धावा  केल्या. भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने भेदक मारा करत इंग्लंडचे ६ फलंदाज माघारी धाडले तर इंग्लंकडून जोस बट्लर आणि बेन स्टोक्सने अर्धशतक झळकावले. या अर्धशतकांच्या जोरावरच इंग्लंड  २६८ धावांवर पोहचू शकला.

नाणेफेक जिंकून भारताने इंग्लंडने फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. इंग्लंडने आपल्या डावाची सुरुवात सावध करत विकेट गमावली नाही. पाच षटकानंतर इंग्लंडचे सलामीवीर जॉन बेस्ट्रो आणि जेसन रॉय यांनी धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्यांनी १० षटकात ७० धावा केल्या. 

इंग्लंडच्या जमलेल्या सलामी जोडीला फोडण्यासाठी  भारताने फिरकी गोलंदाजांना पाचारण केले. कुलदीप यादवने आपल्या कर्णधाराला निराश न करत रॉयला ३८ धावांवर माघारी धाडले. ही  जोडी फुटल्यानंतर कुलदीपने विकेट घेण्याचा धडाकाच लावला.  रुट आणि बेस्ट्रोला पाठोपाठ बाद केले.  त्यानंतर आलेला मॉर्गनही १९ धावा करुन माघारी परतला.  वरच्या फळीतील ४ फलंदाज १०५ धावातच माघारी परतल्यानंतर मैदानात आलेल्या बट्लर आणि स्टोक्सने इंग्लंडचा डाव सावरला. दोघांनीही अर्धशतके करत ९३ धावांची भागिदारी रचली.

ही जमलेली जोडी देखील कुलदीप यादवने फोडली. त्यांने पहिल्यांदा बट्लरला ५३ धावांवर आणि स्टोक्सला ५० धावांवर बाद करत एकट्याने इंग्लंडच्या निम्या संघाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.  त्यानंतर आलेल्या मोइन अली आणि आदिल राशिदने काही चांगले फटके मारत इंग्लंडला २६८ धावांपर्यंत पोहचवले.

भारताकडून कुलदीप यादवने ६ उमेश यादवने २ तर चहलने १ बळी टिपला.