Wed, Apr 01, 2020 06:50होमपेज › Sports › INDvsNZWविजयाची हॅटट्रिक; भारत सेमीफायनलमध्ये

INDvsNZWविजयाची हॅटट्रिक; भारत सेमीफायनलमध्ये

Last Updated: Feb 27 2020 11:26PM
मेलबर्न : वृत्तसंस्था
भारतीय महिला संघाने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक केली. ऑस्ट्रेलिया, बांगला देश यांच्यानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडवरही विजय मिळवला. या विजयामुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.

शेफाली वर्माने 34 चेंडूंत 46 धावा केल्या. तिच्या फटकेबाजीनंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी चोख कामगिरी बजावताना संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडच्या अ‍ॅमेलिया केरने अखेरच्या दोन षटकांत तुफान फटकेबाजी करून सामन्यात चुरस निर्माण केली होती. मात्र, तिला विजयाला गवसणी घालता आली नाही. भारताने किवींना 130 धावांवर रोखत 3 धावांनी सामना जिंकला. भारताने तीन पैकी तीन सामने जिंकून 6 गुणांसह गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.

किंवीविरुद्ध झालेल्या सामन्यात सलामीवीर शेफाली वर्मा हिने 46 धावांची खेळी करीत महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात स्मृती मानधनाचे पुनरागमन झाले. तापामुळे तिला दुसर्‍या लढतीला मुकावे लागले होते. स्मृतीने चौकार खेचून धावांचे खाते उघडले खरे, परंतु तिसर्‍या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर ली ताहूहूच्या गोलंदाजीवर ती त्रिफळाचित झाली. तिने केवळ 11 धावांच केल्या. 

शेफालीने सलग 2 षटकार खेचून अर्धशतकाकडे कूच करण्याची संधी मिळाली. 10 व्या षटकात भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. अ‍ॅमेलिया केरने पहिल्याच चेंडूवर तानिया भाटियाला बाद केले. तानिया आणि शेफाली यांनी 51 धावांची भागीदारी केली. तानिया 23 धावा करून माघारी परतली. 12 व्या षटकात रोझमेरी मेयरने भारताला तिसरा धक्का दिला. तिने जेमिमा रॉडिंग्जला बाद केले. जेमिमाला केवळ 10 धावांच करता आल्या. गेल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेली कर्णधार हरमनप्रीत केवळ 1 धावच करून ती बाद झाली. हरमनप्रीतनंतर किंवींनी भारताला चौथा  धक्का दिला. शेफाली वर्मा हिला अर्धशतकाने हुलकावणी दिली. शेफालीने 34 चेंडूंत 46 धावांची खेळी केली. त्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकांराचा समावेश आहे. तिला तानिया भाटियाने (23) दिलेली साथ याच्या बळावर भारताला 20 षटकांत 8 बाद 133 धावांवर समाधान मानावे लागले. 

134 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 34 धावांत 3 धक्के बसले. शिखा पांडे, दीप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी पहिल्या दहा षटकांत किवींना हे धक्के दिले. कॅटी मार्टिन आणि मॅडी ग्रीन यांनी चौथ्या विकेटससाठी 43 धावांची भागीदारी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. राजेश्वरी गायकवाडला ही जोडी फोडण्यात यश आले. तिने ग्रीनला (24) धावांवर बाद केले. राधा यादवने मार्टिनला बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. मार्टिनने 25 धावा केल्या. क्षेत्ररक्षकांनीही गोलंदाजांना साजेशी साथ दिली. अ‍ॅमेलिया केरने पहिल्या दोन सामन्यांतील ‘मॅचविनर’ पूनम यादवच्या 19 व्या षटकात गोलंदाजीवर 18 धावा केल्या. यामध्ये केरने चार चौकार खेचले. परंतु, तिला अखेरच्या 6 चेंडूंत विजयासाठीच्या 16 धावा करता आल्या नाहीत. न्यूझीलंडला 20 षटकांत 6 बाद 130 धावांवर समाधान मानावे लागले.

संक्षिप्त धावफलक
 भारत : 20 षटकांत 8 बाद 133 धावा. (शेफाली वर्मा 46, तमन्ना भाटिया 23. रोझमेरी मेअर 2/27)
 न्यूझीलंड : 20 षटकांत 6 बाद 130 धावा. (कॅटी मार्टिन 25, अ‍ॅमेलिया केर 34. राजेश्वरी गायकवाड 1/22)
 

१४०
भारताने या विजयासह सहा वर्षांपासून कोणत्याही संघाला शक्य न झालेला पराक्रम करून दाखवला. 2014 पासून न्यूझीलंडच्या संघाने 140 धावा किंवा त्यापेक्षा कमी धावांचे आव्हान ठेवलेल्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवला होता. न्यूझीलंडने या कालावधीत 20 टी-20 सामन्यांत 140 पेक्षा कमी धावा केल्या होत्या आणि त्या सगळ्या सामन्यांत न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवला होता. भारतानेदेखील न्यूझीलंडच्या संघाला 134 धावांचे (140 पेक्षा कमी) आव्हान दिले होते, पण या सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवता आला नाही.

शेफाली वर्मा ४६ धावा 
16 वर्षीय शेफालीने 34 चेंडूंत 46 धावांची खेळी केली व त्यासाठी तिची निवड सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून करण्यात आली.  ‘माझ्या कामगिरीने मी आनंदी आहे. मला सलग अशी कामगिरी करायची आहे. मी खराब चेंडूंची वाट पाहिली आणि त्यावर मोठे फटके मारले,’ असे शेफाली वर्मा म्हणाली. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिर्व्हाइनने आपल्या गोलंदाजांचे कौतुक केले.