Wed, Jul 08, 2020 18:46होमपेज › Sports › अखेर सामन्यावर पाणी फिरलेच; आता रविवारच्या सामन्याची चिंता

अखेर सामन्यावर पाणी फिरलेच; आता रविवारच्या सामन्याची चिंता

Published On: Jun 13 2019 3:02PM | Last Updated: Jun 13 2019 8:08PM
नॉटिंगहॅम : पुढारी ऑनलाईन  

वर्ल्डकपमधील १८ वा भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसाचाच खेळ झाल्याने रद्द झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून या सामन्यावर पावसाचे सावट होते. त्याप्रमाणे सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाने आपली बॅटिंग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे नाणेफेकही झालेली नाही. नाणेफेक न झाल्याने दोन्ही संघांची घोषणाही झाली नाही. त्यामुळे भारतीय संघात जखमी शिखर धवनच्या जागी कोणाची वर्णी लागली आहे याची महिती मिळू शकली नाही. अखेर सामना रद्द झाल्याने प्रत्यकेी एक गुण देण्यात आला. त्यामुळे न्यूझीलंड ७ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानवार आहे तर भारत ५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

आज (दि. १३) होणाऱ्या या सामन्यात वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत पराभव न झालेले दोन संघ एकमेकांना भिडणार होते. त्यामुळे आज कोणाच्या गुणतक्त्यात हरण्याचा कॉलम खाते उघडणार? याचीच चर्चा होती. भारत आणि न्यूझीलंड वर्ल्डकपमध्ये एकूण सात वेळा समोरासमोर आले आहेत. त्यातील तीन वेळा भारताने, तर ४ वेळा न्यूझीलंडने सामना जिंकला आहे. पण, २००३ च्या वर्ल्डकपनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना झालेला नाही. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. 

इंग्लंडमध्ये खेळवण्यात येत असलेल्या यंदाच्या वर्ल्डकपमध्ये हा चौथा सामना आहे जो पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज, बांगला देश आणि श्रीलंका, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचे सामने पावसामुळे रद्द करण्यात आले आहे. एखाद्या वर्ल्डकपमध्ये इतके सामने पावसामुळे रद्द होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी. त्यामुळे क्रिकेट चाहते नाराज झाले आहेत. इंग्लंडच्या लहरी हवामानाची कल्पना असताना वर्ल्डकपचे आयोजक पद त्यांना का दिले  अशी विचारणा करत आहेत.  भारताचा पुढचा सामना रविवारी ( दि.१६ ) पाकिस्तान बरोबर मँचेस्टरच्या ओल्ड ट्रफोर्डवर  होणार आहे. त्यामुळे भारतीय चाहते रविवारपूरते वरुण राजाला प्रसन्न करून घेण्यासाठी देव पाण्यात बुडवून बसणार यात काही शंका नाही.