Thu, Jun 27, 2019 18:38होमपेज › Sports › वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर ; विजय शंकर, दिनेश कार्तिकला 'लॉटरी'!

वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर ; विजय शंकर, दिनेश कार्तिकला 'लॉटरी'!

Published On: Apr 15 2019 3:32PM | Last Updated: Apr 15 2019 3:56PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

इग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज (ता.१५) घोषणा करण्यात आली. दुसरा यष्टीरक्षक आणि चौथ्या क्रमांकासाठी कोणाला संधी मिळणार? याकडे संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष होते. या चुरशीच्या स्पर्धेमध्ये अनुभवी दिनेश कार्तिक आणि विजय शंकरने बाजी मारली. लोकेश राहुल आणि रवींद्र जडेजालाही संघात संधी मिळाली. 

कार्तिक आणि शंकरला संधी मिळाल्याने अंबाती रायुडू, ऋषभ पंत यांना संघातून डच्चू देण्यात आला. मुंबईमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळच्या (बीसीसीआय) आयोजित पत्रकार परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद आणि अमिताभ चौधरी यांनी घोषणा केली. 

संघाची घोषणा करताना निवड एम. एस. के. प्रसाद म्हणाले, विजय शंकर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल यावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर आपल्याकडे लोकेश राहुलचाही पर्याय आहे. रिषभ पंतच्या नावावरही जवळपास शिक्कामोर्तब होणार होते, पण यष्टीरक्षकमुळे त्याची संधी हुकली. 

कार्तिकची दबावाखालील फलंदाजी तसेच फिनीशिंगच्या त्याच्या खेळी पाहिल्या आहेत, त्यामुळेच त्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे प्रसाद यांनी नमूद केले. चौथा वेगवान गोलंदाज म्हणून खलील अहमदच्या नावावरही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. धोनीच्या अनुपस्थितीमध्येच कार्तिकला संधी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या जागेसाठी दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यामध्ये चुरस होती. अखेर अनुभवी कार्तिक सरस ठरला. अंबाती रायुडूची जलदगती गोलंदाजांना सामना करण्याच्या अडचणीमुळे त्याच्या अडचणीत भर पडली. विजय शंकरच्या रूपाने भारताला फलंदाजीसोबत गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. 

भारतीय संघ पुढीलप्रमाणे

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के एल राहुल, विजय शंकर, महेंद्र सिंह धोनी, दिनेश कार्तिक, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा