Sun, Feb 23, 2020 16:22होमपेज › Sports › ENGvsAUS : ऑस्ट्रेलियन माऱ्यापुढे इंग्लंड निष्प्रभ; अवघ्या 67 धावांतच खुर्दा

इंग्लंडचा अवघ्या 67 धावांमध्ये धुव्वा

Published On: Aug 23 2019 7:22PM | Last Updated: Aug 23 2019 7:43PM
लंडन : वृत्तसंस्था

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात कांगारूंना पहिल्या डावात 170 धावांत गुंडाळले. मात्र, ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीही इंग्लंडचा डाव फक्त 67 धावांत संपुष्टात आणल्याने त्यांना 112 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळाली आहे. इंग्लंडकडून जे काम जोफ्रा आर्चरने केले होते, तेच काम ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूडने केले. त्याने केवळ 30 धावांत साहेबांचा अर्धा संघ तंबूत धाडला. इंग्लंडचा जो डेनले (12) याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

संघाची धावसंख्या दहा असताना हेझलवूडने जेसन रॉय (9) आणि कर्णधार जो रुट (0) यांना तंबूत धाडले. यानंतर इंग्लंडला पाठोपाठ धक्के बसत गेले. पॅट कमिन्सने रॉरी बर्न्स (9) याला बाद करून इंग्लंडच्या अडचणी वाढवल्या. दुसर्‍या कसोटीतील शतकवीर बेन स्टोक्स (8) आणि जो डेनले (12) या दोघांना पॅटिन्सनने माघारी धाडले. बेअरस्टो (4) आणि बटलर (5) यांना हेझलवूडने जम बसवू दिला नाही. ख्रिस वोक्स (5) आणि जोफ्रा आर्चर (7) ही जोडी कमिन्सने तंबूत धाडली. जॅक लिचला बाद करीत हेझलवूडने आपला पाचवा बळी टिपला. कांगारूंच्या वेगवान त्रिकुटाने केवळ 27.5 षटकांतच इंग्लंडचा डाव फक्त 67 धावांत गुंडाळला.

तत्पूर्वी, तिसर्‍या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत आटोपला. आपल्या वेगवान गोलंदाजीने लॉर्डस् कसोटीत कांगारूंना चांगलेच दमवणार्‍या जोफ्रा आर्चरने या कसोटीतही 6 विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. 

तिसर्‍या अ‍ॅशेस कसोटीत इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रूटचा हा निर्णय आर्चर आणि ब्रॉडने सार्थ ठरवत मार्कस हॅरिस (8) आणि उस्मान ख्वाजा (8) यांना स्वस्तात माघारी धाडले; पण त्यानंतर सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लबुशचाग्ने यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. या दोघांनी तिसर्‍या विकेटसाठी 111 धावांची भागीदारी रचली. यात वॉर्नरच्या 61 धावांचा वाटा महत्त्वपूर्ण होता. 

अखेर आर्चरने एक वेगवान चेंडू टाकून वॉर्नरला बाद केले. त्यानंतर कांगारूंचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्यांचे 3 फलंदाज अवघ्या 3 धावांत माघारी परतले. 2 बाद 136 धावांवर असणार्‍या कांगारूंचा डाव 179 धावांवर आटोपला. मार्नसने 129 चेंडूंत 74 धावा करून एकाकी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला; पण त्याला दुसर्‍या बाजूने कोणाचीही साथ मिळाली नाही.  इंग्लंडकडून आर्चरने 17.1 षटकांत 45 धावा देत 6 बळी टिपले.