विश्वचषक 2019 मध्ये 'या' कामगिरीचा वॉर्नर पहिला मानकरी

Published On: Jun 25 2019 5:57PM | Last Updated: Jun 25 2019 5:57PM
Responsive image


लंडन : पुढारी ऑनलाईन

विश्वचषक 2019 मध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत हाय होल्टेज लढत होत आहे. पहिल्यांदा फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियन सलामीवीरांनी शतकी सलामी दिली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नर याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. 

यंदाच्या विश्वचषकात पहिल्यांदा 500 धावा करण्याची कामगिरी वॉर्नरच्या नावे झाली आहे. विशेष म्हणजे ही कामगिरी वॉर्नरने त्याच्या सातव्या सामन्यातच केली आहे. यामध्ये त्याच्या दोन द्विशतकी खेळींचा समावेश आहे. क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्सवर पारंपरिक प्रतिस्पर्धी इंग्लंडच्या विरोधात खेळताना आज पुन्हा वॉर्नरने अर्धशतकी खेळी केली. त्याने 61 चेंडूंचा सामना करताना 53 धावा केल्या.

दरम्यान, कर्णधार ऍरॉन फिंचनेही शतकी खेळी करत वैयक्तीक धावसंख्येत 496 धावांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. फिंचला त्याला 500 धावांचा टप्पा ओलांडण्यासाठी 4 धावा कमी पडल्या. शतक साजरे केल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर आर्चरने त्याला टिपले. विशेष म्हणजे यंदाच्या विश्वचषकात दोन्ही खेळाडूंनी सलामीसाठी तिसरी शतकी भागिदारी केली. 476 धावांसह तिसऱ्या स्थानावर बांगला देशचा खेळाडू शाकिब-उल-हसन आहे.