Mon, Aug 26, 2019 14:39होमपेज › Sports › 'धोनीच्या भविष्याबाबत चर्चा करा'

'धोनीच्या भविष्याबाबत चर्चा करा'

Published On: Jul 18 2019 4:48PM | Last Updated: Jul 18 2019 4:50PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव स्विकारल्यानंतर सर्वांच्या नजरा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर आहेत. विश्वचषक स्पर्धा पार पडल्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहेत. तसेच बीसीसीआयने धोनीला अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा इशारा दिल्यानंतर आता माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी धोनीच्या निवृत्तीवर मौन सोडले आहे.

किरण मोरे म्हणाले की, महेंद्रसिंह धोनी हा अनुभवी खेळाडू आहे. त्याच्यासारख्या खेळाडूंबाबत निर्णय घेताना निवड समितीने सगळ्या गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. निवड समिती सदस्यांनी धोनीशी त्याच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली पाहिजे. तसेच निवड समितीला धोनीबाबत काय वाटते हे देखील त्यांनी धोनीला सांगितले पाहिजे. असे केल्यास खेळाडू आणि निवडकर्ते यांच्यात कोणताही गैरसमज निर्माण होणार नाहीत आणि याचा भारतीय संघाला फायदाच होईल. 

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने कशा पद्धतीची कामगिरी केली हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे आता भारतीय संघ पुढील दोन वर्षात कसा अधिक परिपक्व होईल, त्यासाठी कोणत्या खेळाडूंना संधी देणे गरजेचे आहे, याचे नियोजन आतापासूनच करणे आवश्यक आहे. सध्याच्या खेळाडूंसाठी आपल्याकडे बॅक-अप खेळाडू तयार असायला हवेत आणि नव्या खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची पुरेशी संधी देण्यात यायला हवी, असेही मोरे यांनी नमूद केले.