'त्यामुळे' टी-२० वर्ल्डकपवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने व्यक्त केली मोठी भिती!

Last Updated: May 29 2020 12:43PM
Responsive image


सिडनी : पुढारी ऑनलाईन 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जर टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलण्यात आला तर हा निर्णय फार धोकादायक ठरु शकेल अशी चिंता आज (दि.29) बोलून दाखवली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी अधिकारी केविन रॉबर्ट्स यांनी यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिायाला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागणार असल्याचे सांगितले. याचबरोबर ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात होणारी टी-20 वर्ल्डकप स्पर्धेचे भवितव्य जागतिक प्रवासावर लावलेल्या निर्बंधांमुळेच अधांतरी लटकल्याचेही मान्य केले.  

रॉबर्ट्स म्हणाले, 'आम्ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होईल याबाबत आशावादी होतो. पण, ते आता होईल याबाबत मोठी शंका आहे.' काल आयसीसीच्या बोर्ड मिटिंगमध्ये टी-20 वर्ल्डकपच्या भविष्याबाबतचा निर्णय 10 जूनपर्यंत टाळण्यात आळा आहे. यावेळी आम्ही स्पर्धा घेण्यासाठी अजून काही योजना आखता येईल का याची चाचपणी करणार असल्याचे सांगण्यात आले. 

वाचा : टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीची सावध भूमिका

दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी अधिकारी रॉबर्ट्स यांनी, 'जरी स्पर्धा ठरल्याप्रमाणे झाली तरी आम्हाला 80 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा तोटा होणार आहे. कारण शारीरिक अंतराच्या कडक नियमांमुळे ही स्पर्धा रिकाम्या मैदानावर घेण्यात येईल आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाला याची चांगलीच कल्पना आहे.' असे म्हणाले.  ते पुढे म्हणाले 'जर सामान्य प्रेक्षक मैदानात आले तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 50 मिलियन आस्ट्रेलियन डॉलर उत्पन्न मिळते. टी-20 वर्ल्डकप स्पर्धा म्हटल्यानंतर अजून 20 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर मिळाले असते. त्यातच यंदाच्या हंगामात अधिकच्या बायो सुरक्षिततेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 10 मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा खर्च येणार आहे.'

पण, या सर्व पार्श्वभुमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी अधिकारी रॉबर्ट्स हे डिसेंबरमधील भारताविरुद्धची 4 कसोटी सामन्यांची मालिका आयोजित करण्याबाबत प्रचंड आशावादी आहेत. मूळ वेळापत्रकानुसार भारत ब्रिसबेन, अॅडलेड, सिडनी आणि मेलबर्न या चार ठिकाणी कसोटी सामने होणार होते. पण, या सामन्यांच्या स्थळात बदल होण्याची दाट शक्यता रॉबर्ट्स यांनी व्यक्त केली.  

वाचा : टोळधाडीच्या ट्विटवरुन संजय मांजरेकर ट्रोल

ते म्हणाले, 'हे वेळापत्रक हे राज्याच्या सीमा प्रवासासाठी खुल्या होतील या हे गृहीत धरुन केलेले आहे. जर समजा तशीचे वेळ आली तर आम्ही हे चार कसोटी सामने एक किंवा दोन ठिकाणीच खेळवू. पण, याबाबत सध्या तरी आम्हाला काहीच माहीत नाही. कारण हे सर्व चार राज्यात प्रवास करण्यासाठी कशी परवानगी मिळते यावर अवलंबून आहे.' 'सध्यातरी हा शक्यतांचा खेळ अमर्याद आहे. आम्ही भारताबरोबरची मालिका खेळवू याबाबत आशावादी आहोत. पण, कोरोना संकटामुळे या मालिका आता वेगळ्याच भासणार आहेत याचीही पूर्ण कल्पनाही आहे.' असे रॉबर्ट्स म्हणाले.