बांगला देशच्या क्रिकेट वर्तुळात कोरोनाचा शिरकाव, प्रशिक्षक बाधित

Last Updated: May 13 2020 3:49PM
Responsive image


ढाका : पुढारी ऑनलाईन 

बांगला देशच्या क्रिकेट वर्तुळात कोरोनाने शिरकाव केला आहे. बांगला देशचे डेव्हलपमेंट कोच आणि माजी प्रथम श्रेणी खेळाडू अशिकुर रहमान यांना कोरोनाची लागण झाली आहे. बांगला देश क्रिकेट बोर्डाच्या माध्यम संमितीचे प्रमुख मोहम्मद जलाल युनूस यांनी रहमान हे सध्या ढाक्यातील मुगदा रुग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगितले. 'त्यांच्या छातीत दुखत होते आम्ही ते लवकरात लवकर बेर होवोत अशी आशा व्यक्त करतो.' अशी प्रतिक्रिया दिली. रहमान यांनी काल स्वतः त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले होते. 

एका क्रीडा विषयक वेबसाईटशी बोलताना रहमान म्हणाले, 'मला चाचणीचा रिपोर्ट काल मंगळवारी मिळाला. त्यात मला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. पहिल्यांदा मला काही कळालेच नाही. मला वाटले माझ्या घशाला सूज आली आहे. त्यानंतर हळूहळू ताप येऊ लागला. त्यानंतर धातीत दुखू लागले. मी डॉक्टरांकडे गेलो तर त्यांनी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले.'

अशिकुर रहमान यांनी 2002 च्या 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले होते. पण, त्यांना बांगला देशच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवता आले नाही. त्यानंतर त्यांनी सहा वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले. त्यांनी 15 प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात 36 तर 18 अ श्रेणी क्रिकेट सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. ते जलदगती गोलंदाजी करायचे. 33 वर्षाच्या रहमान यांनी बांगलादेश महिला क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पदही भुषवले आहे. 

बांगला देशमध्ये सध्या 16 हजाराच्या वर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर 250 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.