Tue, Nov 19, 2019 10:49होमपेज › Sports › भारताला हरवू शकतो : शाकिब

भारताला हरवू शकतो : शाकिब

Published On: Jun 26 2019 1:57AM | Last Updated: Jun 26 2019 1:56AM
साऊथहॅम्प्टन : वृत्तसंस्था

बांगला देशसाठी शेवटचा प्रत्येक सामना ‘करो वा मरो’ असा बनला असल्याने त्यांनी अफगाणिस्तानवर मात करून उपांत्य फेरीचा आपला मार्ग आणखी थोडा प्रशस्त केला. आता त्यांचा पुढील सामना भारताविरुद्ध होणार आहे. परंतु, या सामन्यात आम्ही जर आमची सर्वोच्च कामगिरी केली तर आम्ही भारतालाही नमवू शकतो, असे मत बांगला देशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब-अल-हसन याने व्यक्‍त केले आहे. 

बांगला देशचे शाकिब-अल-हसन व मुशफिकूर रहिम हे खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत. परंतु, उरलेल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचे अत्यंत कठीण लक्ष्य त्यांच्यासमोर आहे. बलाढ्य व यंदाच्या विश्‍वचषकात एकही सामना न गमावलेल्या भारताशी बांगला देशची 2 जुलै रोजी गाठ पडणार आहे. त्यानंतरचा त्यांचा अखेरचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. सात सामन्यांमध्ये तीन सामने जिंकलेला बांगला देशचा संघ पॉईंटस् टेबलमध्ये सात गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. तर, पाचपैकी चार सामने जिंकलेला भारत नऊ गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे.

अफगाणिस्तानवर विजय मिळवल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘सामनावीर’चा किताब मिळवलेला हसन म्हणाला की, भारताबरोबरचा सामना आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आम्हाला माहीत आहे की, ही लढत सोपी नसेल. परंतु, आम्ही आमची सर्वोच्च कामगिरी केल्यास अवघड नाही, असे हसन म्हणाला आहे. एकहाती सामना जिंकून देऊ शकणारे खेळाडू भारतीय संघात आहेत. परंतु, सांघिक कामगिरीचा विचार केला तर आम्ही भारताला हरवण्यासाठी सक्षम असल्याचे शाकिबने म्हटले आहे.

शाकिब महान खेळाडू : सुनील जोशी

शाकिब हा बांगला देशचा महान खेळाडू आहे, असे मत संघाचे फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक सुनील जोशी यांनी म्हटले आहे. शाकिबसह मेहदी हसन आणि मोसादेक हुसेन यांनी केलेल्या कामगिरीवर जोशी यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

शाकिबविषयी बोलताना जोशी म्हणाले, तो महान खेळाडू तर आहेच. शिवाय संघासाठी प्रेरणास्त्रोत्र आहे. त्याने आपल्या कामगिरीत सातत्य ठेवून इतरांना प्रेरित केले आहे. त्याने आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित केले असून, नुकतेच त्याने आपले पाच-सात किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे धावा काढताना त्याचा वेग वाढल्याचे तुम्हाला दिसून येईल. त्याची क्रिकेटबद्दलची भूक वाढतच चालली आहे, संघातील त्याची उपस्थिती खूप महत्त्वाची ठरते आहे.  भारत व पाकिस्तानविरोधातील दोन्ही सामने बांगला देशसाठी महत्त्वाचे असून, गोलंदाज म्हणून शाकिबची कामगिरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. भारतासाठी 15 कसोटी आणि 69 वन-डे सामने खेळलेले माजी क्रिकेटपटू सुनील जोशी बांगला देशचे फिरकी प्रशिक्षक असून, ते भारताबरोबरच्या मुकाबल्यासाठी खास रणनीती आखत आहेत.