Thu, Mar 21, 2019 09:03होमपेज › Sports › ब्लॉग : कोण म्हणतो आयपीएल फलंदाजांचा खेळ आहे?

ब्लॉग : कोण म्हणतो आयपीएल फलंदाजांचा खेळ आहे?

Published On: Apr 16 2018 7:10PM | Last Updated: Apr 16 2018 7:22PMअनिरुद्ध संकपाळ , पुढारी ऑनलाईन

अफगाणिस्तान मध्ये बुझकाशी नावाचा एक खेळ खेळला जातो. या खेळात घोडस्वारांचे दोन संघ असतात. या खेळाचा नियम सधा सोपा असतो त्यामध्ये मुंडी उडवलेली बकरी मैदानाच्या मध्यभागी ठेवलेली असते. ती उचलून एका ठरवून दिलेल्या खड्यात टाकायची असते. ही मुंडी उडवलेली बकरी दोन्ही संघापैकी कोणता संघ जास्त वेळा त्या खड्यात टाकेल तो संघ विजेता ठरतो. मधल्या काळात आयपीएल देखील असाच बुझकाशी खेळासारखा झाला होता. त्यामध्ये गोलंदाजांचे, विशेषतः फिरकी गोलंदाज हे त्या मुंडके उडालेल्या बकऱ्यासारखे झाले होते.

लोकांना फक्त चौकार आणि षटकाराचा पाऊस बघायला आवडतो असा मार्केटिंगवाल्यांचा समज झाला होता त्याचाच परिपाक म्हणून क्रिकेटचे नियम फलंदाज धार्जिणे करण्यात आले. त्यामुळे ज्या संघातील फलंदाज प्रतिस्पर्धी गोलंदाजांची जास्त धुलाई करेल तो संघ विजयी ठरायचा. पाटा खेळपटटया, १० फुट आत घेतलेली सीमारेषा, जाडजूड बॅट यामुळे दिग्गज फिरकी गोलंदाजांनी देखील आपली गोलंदाजीची शैली बदलली त्यांनी चेंडू वळवण्याची कला सोडून देत आपल्याला कमीतकमी मार कसा बसेल याचा विचार करत जोरजोरात गोलंदाजी करण्यास सुरुवात केली. हरभजन सारख्या कसोटीत तब्बल ४१७ विकेट घेणारा दिग्गज ऑफ स्पिनर देखील चेंडू स्पिन करण्याऐवजी तो यॉर्कर टाकायला लागला या सततच्या बचावात्मक  गोलंदाजीमुळे त्याची शैली बिघडली आणि तो भारतीय संघाच्या बाहेर फेकला गेला. टी २० त टिकाव लागावा म्हणून दुसरा, कॅरम बॉल टाकण्याच्या नादात हात कोपरातून वाकू लागले आणि फिरकी गोलंदाजाना बंदीचा सामना करावा लागला. जर का वेळेतच क्रिकेटमधील  बिघडलेला हा समतोल पूवर्वत केला नाही तर फिरकी गोलंदाजीची कला लुप्त होईल. असा इशारा जाणकार आणि माजी खेळाडूंनी दिल्यावर काही नियमात बदलण्यात आले.

या बदलाचा फरक यंदाच्या आयपीएल मध्ये जाणवत आहे. आता फिरकी गोलंदाज चेंडू स्पिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यावेळेची आयपीएल पहिल्या सामन्यापासून रंगदार आणि ‘काटे कि टक्कर’वाली होत आहे. लेग स्पिनर तर आपल्या गोलंदाजीवर फलंदाजांना नाचवत आहेत. याची सुरुवात आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासूनच झाली. याआधी कधीही ज्याचे नाव ऐकले नव्हते त्या मयांक मार्कंडेयने सीएसकेचा कर्णधार धोनीला अप्रतिम गुगलीवर पायचीत पकडले. काही वर्षापूर्वी प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धेत पियुष चावलाने सचिन तेंडूलकरचा असाच एका गुगलीवर त्रिफळा उडवला होता. त्यावेळी चावला सचिनचा त्रिफळा उडवणारा गोलंदाज म्हणून प्रसिद्ध झाला होता. असेच एक नाही तर दोन प्रसंग या आयपीएल मध्ये  घडलेत. पहिला मार्कंडेयचा चेंडू तर दुसरा अफगाणिस्तानच्या १७ वर्षाच्या मुजीब रहमानचा गुगली, ज्याच्यावर भारताचा कर्णधार विरट कोहलीचा उडालेला त्रिफळा. सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजाचा बॅट पॅड गॅप मधून त्रिफळा उडवणे ही १७ वर्षाच्या पोरासाठी या सारखी ‘ड्रिम विकेट’ नाही. आतापर्यंतच्या आयपीएल सामन्यातील हे दोन चेंडू सर्वोत्तम आहेत. याचबरोबर हैदराबादचा राशीद खान याचा मुंबई विरुद्धच्या सामन्यातील अफलातून स्पेल हाही तितकाच स्पेशल होता. त्याने ४ षटकात अवघ्या १३ धावा देत १ विकेट मिळवली होती. हा स्पेल टाकताना त्याची देहबोली आक्रमक होती त्याच्या देहबोलीतून मी टाकलेला चेंडूवर षटकार मारून दाखवच असे आव्हान तो देत होता. हा फिरकी गोलंदाजांमध्ये झालेला बदल दिलासा देणारा आहे. आता फिरकीपटू ‘मुंडके उडालेली बकरी’ नाही. ते आता वाघाप्रमाणे डरकाळी फोडत आहेत. यामुळेच आयपीएल संघाच्या मालकांमध्ये फिरकी गोलंदाजांना विशेषतः लेग स्पिनरना आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ लागलेली असते.  

हा झालेला बदल नक्कीच स्वागतार्ह आहे. यामुळे एकांगी झालेला खेळ पुन्हा समतोल झाला आहे. आता सामना बॉल आणि बॅट यांच्यात होत आहे. त्यामुळे यंदाचा आयपीएल हंगाम सुरुवातीपासूनच चुरशीचा होत आहे.