कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी 

Last Updated: Nov 05 2019 7:14PM
Responsive image

पुढारी ऑनलाईन : अनिरुद्ध संकपाळ 


इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपनंतर भारतात एकच चर्चा होती ती म्हणजे विराटला कर्णधार पदावरुन हटवण्याची. पण, आता ती चर्चा होत नाही कारण नुकातच विराटने कर्णधार म्हणून भारतातील सर्व यशस्वी कर्णधारांचे सर्व विक्रम मागे टाकले आहेत. विशेष म्हणजे काही जाणकारांच्या मते त्याच्या कारकिर्दितील विक्रमांमध्ये वनेडेतील विक्रमांची संख्या मोठी असेल पण, नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेत त्याने अनेक विक्रमांना गवसणी घालत आपण आता सर्वच स्थरावर परिपक्व होत आहोत याची प्रचिती दिली. आज विराट ३१ व्या वर्षात पदार्पण करत आहे. आता तो एक १९ वर्षाचा खट्याळ मुलगा राहिला नाही. ज्याप्रमाणे त्याची स्टायलिश दाढी आता हळुहळू पिकू लागली आहे. त्याप्रमाणे तो आता परिपक्व होत आहे. तसेही भारताच्या क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार होणं म्हणजे डोक्याची केसं घालवून ( दादा ) घेणं आणि दाढी पिकवून (माही ) घेणच असतं. 

विराट कोहलीची आकडेवारी, त्याच्या विक्रमांचे सुसाट सुटलेले मिटर हे भारतातील जवळपास प्रत्येक चाहत्याला तोंडपाठ आहे. त्यामुळे त्याची उजळणी करण्यात अर्थ नाही. पण, विराट आता वयाची तिशी पार करतोय. या वयात सगळ्यांचाच वात्रटपणा कमी होऊन ते काही अंशी प्रघल्भ होण्याकडे वाटचाल करत असतात. विराटही अशीच वाटचाल करतोय का? गेल्या काही घटनांकडे पाहता विराट आता परिपक्व होत आहे असे जाणवते. याचे उदाहरण म्हणजे त्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यावेळी स्टिव्ह स्मिथला काही प्रेक्षक चिडवत होते. पण, विराटने त्या प्रेक्षकांना गप्प करत स्मिथच्या कमबॅकला पाठिंबा दर्शवला. तसे बघायला गेले तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विराट आणि स्मिथ एकमेकांचे स्पर्धक आहेत पण, विराटने कठीण काळात स्मिथला पाठिंबा देत स्पोर्ट्समनशीप काय असते याचे उदाहरण घालून दिले. 

या कृतीमुळे विराट हा एक वात्रट मुलगा आहे. त्याची मैदानावर असलेली अतिआक्रमकता हाच त्याचा मुळचा स्वभाव असल्याचा ग्रह बऱ्याच जणांचा झाला होता. पण, त्याने ही त्याची मैदानावरची स्ट्रॅटेजी असल्याचे सांगितले होते. त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी ही आक्रमकता त्याला प्रेरित करते असे त्याचे म्हणणे आहे. सध्या त्याची ही आक्रमकता थोडी कमी झाली असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भारताचे माजी खेळाडू फारुख इंजिनिअर यांनी कमी अनुभवाच्या मुद्द्यावरुन निवड समितीवर टीका केली होती. पण, ही टीका करताना त्यांनी विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माला मधे आणत निवड समितीने वर्ल्डकप दरम्यान अनुष्काला फक्त चहाचे कप आणून देण्याचे काम केल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांचा रोख हा निवड समिती विराटच्या इशाऱ्यावर काम करत असल्याकडे होता पण, यात अनुष्काला ओढल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले. अनुष्काने यावर स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली. त्यानंतर फारुख इंजिनिअर यांना अनुष्काची माफी मागायला लागली. विशेष म्हणजे या प्रकरणात विराटने एक अवाक्षरही न काढता आपल्या लेखी या वादाची काय किंमत आहे हेच अधोरेखित केले.

नुकतेच क्रिकेट वर्तुळात मानसिक संतुलनाची चर्चा होत आहे. इंग्लंडची प्रसिद्ध आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केलेली विकेट किपर सारा टेलरने मानसिक स्वास्थ्याच्या कारणाने आपण क्रिकेट मधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल यानेही याच कारणास्तव क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. हे दोन्ही खेळाडू मैदानावर हसऱ्या चेहऱ्याने वावरत होते त्यामुळे त्यांना मानसिक दृष्ट्या काही अडचण असेल असे जाणवले नाही. या दोन उदाहरणावरुन ज्यावेळी तुम्ही व्यावसायिक खेळाडूंवर किती मानसिक दबाव असतो याची कल्पना लोकांना यायला लागली आहे.

याच दृष्टीकोणातून भारताचा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार असलेल्या व्यक्तीवर किती दबाव असेल याची जाणीव होते. भारताच्या १०० कोटीच्या वर असलेल्या क्रिकेट वेड्या चाहत्यांच्या आपेक्षांवर खरे उतरायचे. माध्यमांचा उतावळेपणा, लहरीपणा सांभाळायचा, सोशल मीडियावरली अनसोशल घटकांची डोकेदुखी तर रोजचीच असते. सेलिब्रेटी पत्नी असल्याचे साईड इफेक्टही सहन करायचे. एवढ सगळ करताना मानसिक दमछाक होणार हे नक्की असते. यात भरीस भर म्हणजे भारताचा क्रिकेट कार्यक्रम हा सर्वात व्यस्त कार्यक्रम असतो त्याचा ताण वेगळाच. पण, विराटने हे समर्थपणे सांभाळले आहे. त्याबाबतीत हॅट्स ऑफच. विराट हा मानसिक दृष्ट्या कणखर का आहे याचे उत्तर आपल्याला त्याने १५ वर्षाच्या स्वतःलाच लिहिलेल्या पत्रातून मिळते. 

त्याने स्वतःलाच स्वतःच्या जडणघडणीविषयी पत्र लिहिणे हे विशेष आहे. त्याने स्वतःला यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे हे स्वतःच सांगितले. यातील काही मुद्दे सर्वांसाठीच आदर्श आहेत. खेळाडू म्हणून तुम्ही कुठंपर्यंत पोहोचता यापेक्षा तुम्ही कसा प्रवास करता हे महत्वाचे असते असे त्याने लिहिले आहे. हे सुत्र सामान्य माणसाच्या सामान्य आयुष्यातही लागू होते. ज्याला हे कळाले त्याचा छोट्या मोठ्या गोष्टी मिळाल्या किंवा नाही मिळाल्या तरी त्याचा प्रवास सुरुच असतो. यामुळे तुम्ही तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळवू शकता. विराट लिहितो की सगळेच जण अपयशी ठरतात पण त्यानंतर उभारी घेणे महत्वाचे असते. सतत प्रयत्नवादी असाल तर यश मिळतेच. 

त्याच्या पत्राच्या दुसऱ्या भागात त्याने आपल्या वडिलांविषयी लिहिले आहे त्याने वडिलांनी त्याला हवा असलेला शूज घेऊन दिला नाही म्हणून नाराज होऊ नको ही गोष्ट त्यांनी सकाळी प्रेमाने मिठी मारण्यापुढे हे काहीच नाही असे लिहिले आहे. यावरुन विराटने पुढच्या पिढीला संदेश देताना गिफ्ट्सपेक्षा आपल्या आई वडिलांचे प्रेम महत्वाचे असते हे सांगितले. आपण उगाचच त्याला त्याच्या आक्रमकपणामुळे बालिश आणि वात्रट म्हणत होतो. 

त्याचे हे पत्र गांभिर्याने वाचले तर विराट इतका दबाव झेलूनही कसा यशस्वी होतो. त्याला नैराश्य का येत नाही किंवी तो नैराश्यातून लगेच कसा बाहेर पडतो याचे गणित समजते. त्यामुळे विराट कामगिरी करणाऱ्या विराटची पुढची कारकिर्द कशी असेल याचीही झलक दिसते. विराटने आता तिशी पार केली आहे त्याला याच्या शुभेच्छा आणि तो अशीच विराट कामगिरी करुन इतरांना प्रेरणा देत राहो ही सदिच्छा.