स्टोक्सच्या खेळीने वर्ल्डकपमधील ओव्हर थ्रोचे मभळ दूर

Published On: Aug 26 2019 1:02PM | Last Updated: Aug 26 2019 2:41PM
Responsive image

अनिरुद्ध संकपाळ : पुढारी ऑनलाईन 


क्रिकेटचे जनक म्हणून मिरवणाऱ्या इंग्लंडने अखेर आपले वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न तब्बल 44 वर्षानंतर पूर्ण केले. वर्ल्डकप फायनलचा हिरो ठरला तो मुळचा न्यूझीलंडचा असलेला बेन स्टोक्स. त्याने झुंजार नाबाद 84 धावांची खेळी केली. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाला. अखेर सामन्यातील जास्त बाऊंडरीच्या जोरावर इंग्लंडला विजयी 'घोषित' केले. त्यातच जगविख्यात माजी अंपायर सायमन टफेल यांनी वादग्रस्त ठरलेल्या अखेरच्या षटकातील ओव्हर थ्रोवर 6 धावा देण्यावर आक्षेप घेत एक धाव जादा दिल्याचा दावा केला.

त्यामुळे इंग्लंडच्या पहिल्या वर्ल्डकप 'घोषित' विजयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. त्यातच तो ओव्हर थ्रो स्टोक्सच्या बॅटला लागून बाऊंडरीच्या पार गेल्याने त्याला न्यूझीलंडच्या पहिल्या वहिल्या वर्ल्डकप विजयात बॅट आडवा घालणारा अशा प्रतिमा तयार झाली होती. जरी त्याने झुंजार 84 धावा केल्या असल्या तरी, सुपर ओव्हरमध्ये 15 धावातील 8 धावा केल्या तरी त्याच्या त्या बॅटला लागून गेलेल्या ओव्हर थ्रोवरच सर्वांचा फोकस राहिला. 

वर्ल्डकपनंतर इंग्लंड आणि स्टोक्सची जन्मभूमी न्यूझीलंडनेही त्याला त्याच्या उत्कृष्ट खेळासाठी नागरी पुरस्कार देऊ केले. पण, क्रिकेट चाहत्यांच्या मनात तो ओव्हर थ्रो घर करुन गेला. त्यातच त्याने अंपायरना त्या ओव्हर थ्रोच्या रन पकडू नका असे सांगितल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण, अंपायरनी असे काही घडले नसल्याचे सांगितले. त्यामुळे ज्यांना यंदाच्या वर्ल्डकपवर न्यूझीलंडचा अधिकार आहे असे वाटत होते त्यांचा स्टोक्सकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळाच होता. पण, या पठ्याने हा त्यांचा दृष्टीकोण महिन्या-दीडमहिन्यातच बदलला. त्याने अॅशेस कसोटी मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 359 धावांचे आव्हान पार करताना नाबाद 135 धावांची एकाकी झुंजार खेळी केली. ही त्याची खेळी आणि वर्ल्डकप फायनमधील नाबाद 84 धावांच्या खेळीशी साधर्म्य साधणारी आहे. त्यावेळीही त्याने एकाकी झुंज दिली होती आणि त्याला तळातील फलंदाजांची साथ मिळाली नव्हती. आताही अॅशेस कसोटीत त्याला निर्णायक क्षणी तळातील फलंदाजांची साथ मिळाली नाही. 

ज्यावेळी कांगारुंनी यजमान इंग्लंडसमोर 359 धावांचे आव्हान ठेवले त्यावेळी पहिल्या डावात 67 धावात उडालेला खुर्दा पाहता हे आव्हान यजमानांसाठी कठीण वाटत होते. तशी यजमानांची सुरुवातही खराब झाली होती पण, कर्णधार रुट, जो डेन्ली आणि स्टोक्सने इंग्लंडचा डाव सावरला. तरीही आव्हान तसे आवाक्याबाहेरचे वाटत होते. जरी स्टोक्स खेळपट्टीवर असला तरी त्याच्या साथीला फलंदाजी करु शकणारा ख्रिस वोक्स बाद झाला त्यावेळी इंग्लंडला विजयासाठी 98 धावांची गरज होती आणि विकेट राहिल्या होत्या तीन. तसेच हा काही पांढरा बॉल नव्हता, त्यातच कसोटीच्या पाचव्या दिवसाची खेळपट्टी त्यामुळे कांगारु यजमानांना गुंडाळतील आणि मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतील असे वाटत होते पण, स्टोक्सने पॅटिसनला पुढे सरसावत एक स्ट्रेट ड्राइव्ह मारला हा शॉट पाहून सामना अजूनही एकतर्फी झाला नसल्याची जाणिव झाली. त्यातच विजयासाठी 73 धावांची गरज असताना आर्चर आणि ब्रॉडने पाठोपाठ बाद होत स्टोक्सची साथ सोडली. 

पण, न्यूझीलंडच्या तोंडातला वर्ल्डकप हिसकावून घेणाऱ्या स्टोक्सने आता कांगारुंच्या विजयी घास हिसकावून घेण्याचा चंग बाधला होता. नशिबाने त्याला 11 व्या क्रमांकावर खेळायला आलेल्या आणि कांगारुंच्या तोफखाण्याचा 17 वेळा यशस्वी सामना करत विकेट न फेकणाऱ्या जॅक लिचची साथ लाभली. झुंजार स्टोक्सने त्या विजयासाठीच्या 73 धावा एकट्याने काढत सामना जिंकून दिला. हा विजय इंग्लंडसाठी फार महत्वाचा होता कारण हा सामना कांगारुंनी जिंकला असता तर इंग्लंड ही मालिका जिंकू शकला नसता. कारण तीन कसोटी सामन्यातील 2 सामने कांगारुंच्या नावावर झाले असते आणि उरलेले दोन सामने इंग्लंडने जिंकले असते तरी मालिका बरोबरीत सुटली असती. 

त्यामुळे स्टोक्सने मिळवून दिलेल्या विजयाने वर्ल्डकप विजयावरचे ओव्हर थ्रोचे मभळ दूर झाले आहे. आता स्टोक्सच्या हिरोपणावर कोणीही शंका घेणार नाही. तो आता सध्याच्या घडीचा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर आहे यावर कोणाचेही दुमत असणार नाही. म्हणूनच इंग्लंडचा माजी ऑफ स्पिनर स्वानने आपली बहीण स्टोक्सला देण्याचे वक्तव्य केले. या एका खेळीने स्टोक्सचे स्टारडम किती वाढले आहे याची कल्पना येते. जरी  स्वानने बहीण देण्याचे वक्तव्य केले असले तरी त्याला बहीण नाही त्यामुळे स्टोक्स - स्वान असे नातेसंबध तयार होण्याची शक्यता नाही.