लॉकडाऊनमध्ये वर्कआऊट

Last Updated: Mar 25 2020 8:35PM
Responsive image
संग्रहीत छायाचित्र


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संपूर्ण देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. यामुळे टीम इंडियाचे सर्व सदस्य सध्या घरातच आहेत. ते सध्या आपापल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहेत. मात्र, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक निक वेब यांनी नितीन पटेल यांच्यासोबत भारतीय संघातील खेळाडूंसाठी इनडोअर वर्कआऊट प्लॅन तयार केले आहेत. यामुळे सर्व खेळाडू फिट राहतील. 

संघ व्यवस्थापनाशी संबंधित असलेल्या एका सूत्राने सांगितले की, केंद्रीय करारबद्ध असलेल्या खेळाडूंसाठी एक रुटिन तयार करण्यात आले आहे. यामुळे घरात राहूनही खेळाडू तंदुरुस्त राहू शकतील. या सूत्राने सांगितले की, सर्व खेळाडू मग ते कसोटी असू दे की, मर्यादित षटकांचे प्रारूप खेळणारे असोत. या सर्वांसाठी विशेष प्रकारचे फिटनेस रुटिन देण्यात आले आहे. यावर सर्व खेळाडू काम करतील आणि याची नियमित माहिती वेब व पटेल यांना देतील. 

खेळाडूंच्या मागणीनुसारच हे रुटिन प्लॅन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये गोलंदाज आणि फलंदाजांसाठी वेगवेगळे रुटिन प्लॅन्स देण्यात आले आहेत. गोलंदाजांसाठी असा व्यायाम देण्यात आला आहे की, त्यामुळे त्यांची कोअर आणि लोअर बॉडी अधिक मजबूत होईल. तर फलंदाजांसाठीच्या व्यायामाने त्यांचे खांदे आणि मनगट अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल. 

याशिवाय खेळाडूंच्या रुटिन वर्कआऊटला नजरेसमोर ठेवूनही हे व्यायाम तयार करण्यात आले आहेत. जसे की, कर्णधार विराट कोहली वजनासह व्यायाम करणे पसंद करतो. यामुळे त्याच्यासाठी वजन उचलण्याच्या समावेश असलेल्या व्यायामाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये क्लीन अँड जर्क, डेडलिफ्टस् आणि अन्य प्रकारांचा समावेश असेल. तर काही खेळाडू वजनाशिवाय व्यायाम करण्यावर भर देतात. त्यांच्यासाठीही खास प्रकारचे व्यायाम तयार करण्यात येणार आले आहेत.