विराटचे ते ट्वीट अन् धोनी निवृत्तीची चर्चा...

Published On: Sep 12 2019 10:57PM | Last Updated: Sep 13 2019 12:12AM
Responsive image


नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

टीम इंडियाचा भाग होणे आता वाटते तेवढी सोपी गोष्ट राहिलेली नाही. उत्कृष्ट खेळाबरोबरच आता खेळाडूंना फिटनेसवरही लक्ष केंद्रीत करावे लागते. फिटनेस तपासण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या यो-यो चाचणीच्या गुणांत १६.१ ऐवजी ती वाढ करुन १७ पर्यंत केली जाण्याची शक्यता आहे. याबाबतीत कर्णधार विराट कोहली हा सर्व सहकारी खेळाडुंसाठी एक आदर्श उदाहरण आहे. कोहली ने एका सामन्यादरम्यानचा फोटो ट्वीट केला आहे. ज्या मध्ये फिटनेसचा एक उत्तम नमुना पहायला मिळतो. यामध्ये त्याच्या सोबत महेंद्रसिंग धोनी सुद्धा आहे. हे ट्वीट पोस्ट होताच महेंद्रसिंग धोनी निवृत्त होत आहे, अशा चर्चांना उधान आले. काही लोक या फोटो वरुन असा तर्क लावत आहेत की, या फोटो द्वारे विराट कोणते संकेत तरी देत नाही ना, अशीच चर्चा सर्वत्र सुरु झाली.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या ट्वीटर हॅन्डलवरुन एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान वर्ल्ड टी - २०, २०१६ च्या सामन्यातील आहे. हा सामना भारताने ६ गडी राखून जिंकला होता. कोहलीने या फोटोस महेंद्र सिंग धोनीला टॅग करत लिहले आहे, की या सामन्यामध्ये मला धोनीने फिटनेस टेस्ट प्रमाणे पळवले होते. 

विराट कडून हे ट्वीट पोस्ट होताच नेटकऱ्यांमध्ये धोनी निवृत्तीच्या चर्चा सुरु झाल्या. धोनी निवृत्त तरी होत नाही ना ? या एकाच चर्चेने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. नक्की या पोस्ट द्वारे विराट काही संकेत देतो आहे का ? असा वेगळा अर्थ काढला जातोय. मात्र निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी अशा वृत्ताचे खंडन केले आहे. त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये अशी कोणतीही माहिती अधिकृतरीत्या आमच्या पर्यंत आली नसल्याचे म्हटले आहे.  

हा फोटो सामना जिंकल्यानंतरच्या भावना व्यक्त करतानाचा आहे. ज्यामध्ये कोहली घुडघ्यावर बसून आनंद साजरा करतो आहे आणि धोनी विराटकडे पहात त्याच्या जवळ जातो आहे. २७ मार्च २०१६ रोजी मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर हा सामना खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाने २० षटकांत १६० धावा बनवल्या होत्या. भारताने १९.१ षटकांत चार बाद १६१ धावा बनवल्या आणि हा सामना जिंकला होता.

या सामन्यामध्ये विराट कोहली याने ५१ चेंडूचा सामना करत ८२ धावा बनवल्या होत्या. यामध्ये त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारत ऑस्ट्रेलियाची चांगलीच धुलाई केली होती. तसेच धोनी १० चेंडूचा सामना करत तीन चौकारांच्या मदतीने १८ धावा बनवल्या होत्या. या दोघांनी मिळून ६७ धावांची भागिदारी रचली होती. 

भारतासाठी हा सामना अवघड बनला होता. युवराज सिंगच्या रुपात चौथा फलंदाज बाद झाला होता. त्याने २१ धावा केल्या होत्या. त्यावेळी भारताने १४ षटकांत ९४ धावा केल्या होत्या. कोहलीला साथ देण्यास तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात आला होता. कोहली हा ३५ धावांवर खेळत होता. भारताला ६ षटकात ६७ धावांची गरज होती.

यानंतर विराट आणि धोनीने धावपट्टीवर पळत एकेरी आणि दुहेरी धावांचा पाऊस पाडला. दोघांनी ही ऑस्ट्रेलियाच्या खेळाडुंना चकमा देत अनेक एकरी आणि दुहेरी धावा काढल्या. यामध्ये डेव्हीड वॉर्नर सारखा खेळाडू देखील त्यांना या धावा घेण्यापासून रोखू शकला नाही. एकाच षटकात कोहलीने चार दुहेरी धावा घेतल्या. यावरुनच कोहलीच्या फिटनेचा अंदाज आपणास लागू शकतो. याशिवाय त्याने नॅथन कुल्टर नाईल आणि जेम्स फॉकनरच्या गोलंदाजीवर चौकार ही खेचले. शेवटी भारताने पाच चेंडू राखत हा अशक्यप्राय सामना कोहली आणि धोनीमुळे जिंकला.