होमपेज › Sports › ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन 

ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंग यांचे निधन 

Last Updated: May 25 2020 11:35AM
मोहाली :  पुढारी ऑनलाईन 

भारताला तीन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवलेले ज्येष्ठ हॉकीपटू बलबीर सिंग यांचे आज (दि.२५ ) वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. याबाबतची माहिती त्यांचे नातू कबीर यांनी प्रसिद्धीपत्रकाने दिली. बलबीर सिंग यांना १२ मे रोजी ह्रदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने मोहाली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

बलबीर सिंग हे भारतीय हॉकीच्या सुवर्णकाळाचे एक साक्षीदार होते. त्यांनी तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघात महत्वाची भुमिका बजावली. त्यांनी लंडन ऑलिम्पिक (१९४८), हेलसिन्की (१९५२) आणि मेलबर्न (१९५६) या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यातील १९५२ च्या हेलेसिन्की ऑलिम्पिक स्पर्धेत खेळलेल्या संघाचे ते उपकर्णधार होते. तर १९५६ मेलबर्न ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या संघाने सलग तिसऱ्यांदा सुवर्ण जिंकण्याची कामगिरी केली होती. 

बलबीर सिंग यांनी १९४७ ते १९५८ पर्यंतच्या कारकिर्दित तब्बल २४६ गोल मारले आहेत. याचबरोबर ते १९७५ सालच्या विश्वविजेत्या भारतीय हॉकी संघाचे व्यवस्थापकही होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर क्रीडा वर्तुळातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.