Thu, Aug 22, 2019 14:46होमपेज › Sports › RRvMI : स्मिथची कॅप्टन इनिंग; राजस्थानने मुंबईचा केला पराभव

RRvMI : स्मिथची कॅप्टन इनिंग; राजस्थानने मुंबईचा केला पराभव

Published On: Apr 20 2019 3:48PM | Last Updated: Apr 20 2019 7:44PM
जयपुर: पुढारी ऑनलाईन

राजस्थानचा नवा कर्णधार स्मिथने केलेल्या ५९ धावांच्या खेळीमुळे राजस्थानने मुंबईचे १६२ धावांचे आव्हान ५ चेंडू आणि ५ गडी राखून पूर्ण केले. गेल्या काही सामन्यांपासून राजस्थानची मधीली फळी ढेपाळत होती. पण या सामन्यात स्मिथ आणि रियान परागने चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी रचली. त्यामुळेच राजस्थानला यंदाच्या हंगामातील आपला तिसरा विजय मिळवता आला. 

मुंबईने ठेवलेल्या १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या रास्थानने दमदार सुरुवात करत कृणाल पांड्याने टाकलेल्या दुसऱ्याच षटकात १५ धावा कुटून काढल्या. आक्रमक खेळणाऱ्या संजू सॅमसनमुळे राजस्थानने दमदार सुरुवात केली पण, कर्णधारपद गेलेल्या अजिंक्य रहाणे चाचपडत खेळत होता. अखेर १२ चेंडूत १२ धावा करुन माघारी परतला. 

रहाणे बाद झाल्यावर आलेला कर्णधार स्टिव्ह स्मिथने येताक्षणी आक्रमक पवित्रा धारण करत राजस्थानला पहिल्या ६ षटकात ६० धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, १९ चेंडूत ३५ धावांची आक्रमक खेळी करणारा संजू सॅमसनचा अडथळा राहुल चहरने दूर केला. पण, तोपर्यंत स्मिथ फॉर्मात आला होता त्याने राजस्थानला १० षटकात ९० धावांपर्यंत पोहचवले होते. राजस्थान हा सामना लवकर संपवणार असे वाटत असतानाच बुमराह आणि हार्दिक पांड्याने टिच्चून मारा करत राजस्थानच्या धावगतीला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. पण, स्मिथच्या साथीला आलेल्या रियान परागने फटकेबाजी करत मुंबईवर पुन्हा दबाव वाढवला. 

स्मिथने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, त्यानंतर मुंबईने पराग आणि टर्नरला बाद करत सामन्यात रंगत निर्माण केली. सामना अखेरच्या चेंडूपर्यंत गेला पण, अखेर विजय राजस्थानचाच झाला. स्मिथने नाबाद ५९ धावा केल्या तर परागने २९ चेंडूत ४३ धावा करत  त्याला चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ७० धावांची भागिदारी रचली. गेल्या काही सामन्यांपासून राजस्थानची मधली फळी ढेपाळत होती. त्यामुळे विजयाच्या जवळ येवूनही त्यांना विजयाने हुलकावणी दिली आहे राजस्थानचा हा यंदाच्या हंगामातील तिसरा विजय आहे. 

दरम्यान, सलामीवीर क्विंटन डिकॉकच्या ६५ धावांच्या खेळमुळे मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्स समोर १६२ धावांचे आव्हान ठेवले. डिकॉकला सुर्यकुमार यादवने ३४ धावा करुन चांगली साथ दिली. पण, हे दोघेही बाद झाल्यानंतर मुंबईची धावगती मंदावली. अखेरच्या काही षटकात फटकेबाजी करत हार्दिक पांड्याने मुंबईला १५० च्या पार पोहचवले. तो बाद झाल्यानंतर अखेरच्या चेंडूवर बेन कटिंगने षटकार मारल्याने मुंबई १६१ धावांवर पोहचली. 

राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या श्रेयस गोपाळने रोहित शर्माला ५ धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. पण, त्यानंतर मुंबईचा दुसरा सलामीवीर क्विंटन डिकॉकने जोरदार फटकेबाजी करत पॉवर प्लेमध्ये मुंबईला ४६ धावा करुन दिली त्यामध्ये डिकॉकच्या ३३ धावा होत्या. त्यानंतर त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. 

डिकॉकच्या साथीने खेळत असलेल्या सुर्यकुमार यादवने संथ सुरुवातीनंतर आक्रमक खेळ करत आपली धावांची गती सुरधारली. डिकॉक आणि सुर्यकुमारने १० वे षटक संपले त्यावेळी मुंबईला मुंबईला ८२ धावांपर्यंत पोहचवले होते. १० व्या षटकानंतर डिकॉक आणि सुर्यकुमार यादवने धावांची गती वाढवण्यास प्राधान्य दिले. त्यांनी षटकात एकेरी आणि दुहेरी धावा घेण्याबरोबरच एखादा मोठा फटका खेळण्याचे तंत्र अवलंबले. पण, स्टुअर्ट बिनीने सुर्यकुमारला ३४ धावांवर बाद करत ही दुसऱ्या विकेटसाठी ९७ धावांची भागिदारी रचणारी जोडी फोडली. सुर्यकुमार पाठोपाठ डिकॉकचीही ४७ चेंडूत खेळलेली ६५ धावांची आक्रमक खेळी संपुष्टात आली. त्याला श्रेयस गोपाळने बाद केले. 

दोन्ही सेट झालेले फलंदाज बाद झाल्यानंतर हार्दिक आणि पोलार्ड ही मुंबईची हार्ड हिटर जोडी क्रिजवर आली. अखेरची ५ षटकेच राहिली असल्याने त्यांना आक्रमक खेळण्याशिवाय पर्याय नव्हता. पण, जोफ्रा आर्चर आणि उनाडकट यांनी दोघांनाही काही काळ जखडून ठेवले. पोलार्ड १० धावांवर असताना उनाडकटने त्याचा त्रिफळा उडवला. हा मोक्याच्या क्षणी मुंबईसाठी मोठा धक्का होता. पोलार्ड बाद झाल्यानंतर अखेरच्या दोन षटकात हार्दिकने फटकेबाजी करत मुंबईला १५० च्या पार पोहचवले. त्याच्या २३ धावांच्या खेळमुळे मुंबईने राजस्थान समोर १६२ धावांचे आव्हान ठेवले.