Tue, Nov 19, 2019 13:07होमपेज › Sports › टीम इंडियाचे नंबर वन धोक्यात?

टीम इंडियाचे नंबर वन धोक्यात?

Published On: Aug 13 2019 8:45PM | Last Updated: Aug 13 2019 8:36PM
कोलंबो : वृत्तसंस्था

भारतीय संघ गेल्या अनेक महिन्यांपासून आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मात्र, टीम इंडियाचे अव्वल स्थान सध्या धोक्यात येऊ शकते. कारण क्रमवारीत सध्या दुसर्‍या स्थानावर असलेला न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाकडून अव्वल स्थान हिसकावू शकतो. 

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौर्‍यावर आहे. भारताने तीन टी-20 सामन्यांची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली आहे. तर तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेतही भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना बुधवारी होणार आहे. तर पहिला सामना पावसामुळे 13 षटकांच्या खेळानंतर रद्द करण्यात आला होता. 

वन-डे मालिकेनंतर 22 ऑगस्टपासून दोन्ही संघांदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी म्हणजे बुधवारपासून वन-डे वर्ल्डकपचा उपविजेता आणि यजमान श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेस सुरुवात होईल. हे दोन्ही कसोटी सामने जिंकून न्यूझीलंडचा संघ क्रमवारीतील पहिले स्थान पटकावू शकतो. 

कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या भारताचे 113 तर दुसर्‍या स्थानावरील न्यूझीलंडचे 111 गुण आहेत. या दोन्ही संघांत केवळ दोन गुणांचा फरक आहे. न्यूझीलंडने श्रीलंकेला कसोटी मालिकेत 2-0 ने पराभूत केल्यास किवी संघ क्रमवारीत भारताला मागे टाकू शकतो. मात्र, फिरकीस अनुकूल खेळपट्ट्यांवर श्रीलंकेला श्रीलंकेत पराभूत करणे, हे म्हणावे तितके सोपे नाही. यासाठी न्यूझीलंडला खडतर प्रयत्न करावे लागणार आहेत.

श्रीलंका-न्यूझीलंड आजपासून पहिली टेस्ट

गाले : यजमान श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटीस बुधवारपासून प्रारंभ होत आहे. इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या आयसीसी वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत शानदार कामगिरी करून किवी संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. यामुळे पाहुण्या संघाचा आत्मविश्वास बुलंद आहे. याउलट श्रीलंकेचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. द. आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेसाठी खराब फॉर्ममुळे दिनेश चांदिमलला वगळण्यात आले होते. याशिवाय अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूजही या मालिकेत खेळू शकला नव्हता. मात्र, न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत या दोघांनाही संधी मिळाली आहे. मात्र, समतोल संघामुळे न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेपेक्षा सरस वाटतो. किवी संघात फिरकी गोलंदाज अजाझ पटेलचा समावेश करण्यात आला आहे.