Mon, Aug 19, 2019 15:18होमपेज › Sports › रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गमावली संधी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने गमावली संधी

Published On: Feb 11 2019 9:01PM | Last Updated: Feb 11 2019 8:05PM
- संकलन : सुरेश सुतार

न्यूझीलंडमध्ये पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने 4-1 ने खिशात घातली. हा किवींच्या भूमीवरील दुसरा एकदिवसीय मालिका विजय ठरला. मात्र, अशीच शानदार कामगिरी भारतीय संघाला टी-20 मालिकेत नोंदविता आली नाही. यामुळे न्यूझीलंडने पाहुण्या भारताला या मालिकेत 2-1 ने नमवत मायदेशात आम्हीच सरस आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. याशिवाय या मालिकेत आगामी वर्ल्डकपची तयारी करत असलेल्या टीम इंडियाला नियमित कर्णधार विराट कोहली, वेगवान गोलंदाज मोहमद शमी व जसप्रीत बुमराह यांची उणीव मात्र चांगलीच जाणवली. किंबहुना हे दिग्गज असते तर या टी-20 मालिकेचा निकालही भारताच्या बाजूने लागला असता. मात्र, क्रिकेटमध्ये या जर तर च्या गोष्टींना काहीच किंमत नसते.

न्यूझीलंडने रोखला भारताचा विजयी रथ

न्यूझीलंडने रविवारी हॅमिल्टनमध्ये झालेल्या तिसर्‍या टी-20 सामन्यात अवघ्या चार धावांनी निसटता विजय मिळवत मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली. भारताने न्यूझीलंडविरुद्ध गमावलेली ही 29 महिन्यांतील पहिलीच मालिका ठरली. या मालिकेअगोदर सुमारे अडीच वर्षांत भारताने न्यूझीलंडविरुद्ध क्रिकेटच्या कोणत्याही प्रारुपातील मालिका गमावली नव्हती. किवी संघाने अशी कामगिरी करून भारताचा विजयी रथच रोखला.

तीन सामन्यांच्या मालिकेत दुसर्‍यांदा पराभूत

न्यूझीलंडकडून टी-20 मालिकेत पराभूत होण्यापूर्वी भारत 10 मालिकांमध्ये अपराजित राहिला होता. याशिवाय भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत दुसर्‍यांदा पराभव पत्करला आहे. यापूर्वी भारतीय संघाने 2015-16 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली होती. या मालिकेतील पहिले दोन सामने द. आफ्रिकेने जिंकले होते. तर एक सामन्याचा निकाल लागला नव्हता. भारताने द. आफ्रिकेविरुद्ध गमावलेली ही पहिली तीन सामन्यांची मालिका होती. त्यानंतर आता न्यूझीलंडने पराभूत केले. 

भारताने जिंकल्या आहेत 9 मालिका

यापूर्वी भारताने 13 वेळा तीन सामन्यांच्या टी-20 मालिका खेळल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाने निर्विवाद वर्चस्व राखताना 9 मालिका जिंकल्या आहेत. तर, दोन मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. उर्वरित दोन मालिका बरोबरीत सुटल्या. 9 मालिका विजय नोंदविताना टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, झिम्बाब्वे, इंग्लंड, द. आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला पराभूत केले आहे. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन मालिका 1-1 ने बरोबरीत सुटल्या होत्या.

पाकशी बरोबरी साधण्याची हुकली संधी

न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत स्वीकाराव्या लागलेल्या पराभवामुळे टीम इंडियाला पाकशी बरोबरी करण्याची संधी हुकली. पाकिस्तानने सलग 11 टी-20 मालिका जिंकल्या आहेत. (द. आफ्रिकेने नुकत्याच झालेल्या मालिकेत विजय मिळवून पाकची विजयी वाटचाल रोखली होती.) याच विक्रमाशी बरोबरी साधण्याची संधी भारताने गमावली. गेल्या दहा टी-20  मालिकांमध्ये भारतीय संघ अपराजित राहिला होता. यामुळे न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकून पाकशी बरोबरी साधण्याची संधी भारताला होती; पण रोहित आणि कंपनीने ही संधी साधली नाही.

मालिका विजयास श्रीलंकेविरुद्ध सुरुवात

भारताने 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धची टी-20 मालिका गमावली होती. त्यानंतर याचवर्षी झालेल्या श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकून भारताने विजयी वाटचालीस सुरुवात केली होती. यादरम्यान भारताने एकूण 10 मालिका जिंकल्या होत्या. मात्र, न्यूझीलंडने पराभवाचा धक्‍का देत भारताच्या मालिका विजयांचा धडाका रोखला.

रोहितच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच पराभव

आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार रोहित शर्मा सध्या  मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कार्यवाहक कर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकूण आठ मालिका खेळल्या आहेत. यामध्ये तीन वन-डे व पाच टी-20 सामन्यांच्या मालिका खेळल्या आहेत. यामध्ये टीम इंडियाने सात मालिका जिंकल्या आहेत. मात्र, या आक्रमक  खेळाडूच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्यांदाच (न्यूझीलंडकडून) मालिका गमवावी लागली.  

रोहित शर्माने गमावली आणखी एक संधी

जर हॅमिल्टनमध्ये झालेला टी-20 सामना भारताने जिंकला असता तर रोहित शर्माने नियमित कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले असते. रोहितने आतापर्यंत एकूण 14 टी-20 सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व करताना 12 विजय मिळविले आहेत. कोहलीच्या नावेही 12 विजयांची नोंद आहे. मात्र, यासाठी त्याला  20 सामने खेळाले लागले आहेत. 

महेंद्रसिंग धोनी अव्वल

रोहित शर्माला भारताचा दुसरा टी-20 यशस्वी कर्णधार बनण्यासाठी आणखी एका विजयाची आवश्यकता आहे. धोनी हा टी-20 मध्ये टीम इंडियाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे. त्याने  एकूण 72 सामन्यात संघाला 41 वेळा विजय मिळवून दिला आहे. तर कोहली व रोहित शर्मा हे प्रत्येकी 12 विजयांसह दुसर्‍या स्थानावर आहेत.