Thu, Jul 02, 2020 22:14होमपेज › Sports › टीम इंडियाचा न्यूझीलंडविरुद्ध आज सामना

‘धवन’चे अन् पावसाचे सावट

Published On: Jun 13 2019 1:29AM | Last Updated: Jun 13 2019 12:51AM
निमिष पाटगावकर
 

नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिमाखात विजय जरी मिळवला असला तरी या विजयाने आपली अवस्था ‘गड आला पण सिंह जखमी,’ अशी झाली आहे. खरं तर ‘दोन सिंह’ आणि ‘दोन्ही डावखुरे तडाखेबंद फलंदाज’ आपण एकाच दिवशी गमावले. अर्थात, युवराजरूपाने एकाने आपली बॅट कायमची म्यान केली. तर, ओव्हलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पॅट कमिन्सचा चेंडू अंगठ्याला लागल्यावर धवनने शतक पूर्ण केले. भारताला जिंकायला हातभार लावला; पण कमीतकमी तीन आठवडे दुखापतीमुळे त्याला त्याची बॅट म्यान करावी लागणार आहे. 

आयसीसी स्पर्धा मग ती चॅम्पियन्स ट्रॉफी असो वा विश्‍वचषक त्यात बहारदार कामगिरी करणारा शिखर धवन संघाबाहेर गेल्याने भारतीय गोटात इथे पावसाइतकेच चिंतेचे दाट ढग दाटून आले आहेत. ओव्हलला सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना कोहलीने आपली रणनीती स्पष्ट केली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे मोठ्या स्पर्धेतील मोठ्या सामन्यांचे खेळाडू आहेत. तेव्हा पहिल्या तिघांपैकी एकाने शतक काढणे अपेक्षित आहे. या तिघांत तिसरा कोहली स्वतः आहे. तेव्हा या धोरणात त्याचा स्वतःबद्दलचा आत्मविश्‍वास दिसून येत असला तरी या तिघांत एक शतक व्हायला आपल्याला उत्तम सुरुवातीची गरज आहे.

साऊथहॅम्पटनला ती सलामी मिळाली, ओव्हलला त्याहून उत्तम सलामी मिळाली. तेव्हा प्रश्‍न आहे आता पुढे अशी सलामी द्यायला पर्याय काय आहेत? धवनला पर्याय काय आहेत हे बघण्याआधी आपण आयसीसीचा बदली खेळाडूचा नियम बघूया. आज काल बदली खेळाडू तातडीने तेही इंग्लंडला बोलावणे हे प्रवासाच्या द‍ृष्टीने काही अवघड नाही. राखीव खेळाडूंची यादी म्हणून आपण अम्बाती रायडू, ऋषभ पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल आणि नवदीप सैनी यांची नावे दिली आहेत. यातील ऋषभ पंत आज इंग्लंडला रवानाही होत आहे. मला वाटते राखीव खेळाडू बदलायालाही आयसीसीची हरकत नाही. हा विचार केला तर इथे अजिंक्य रहाणे हॅम्पशायरच्या घरच्या मैदानावर साऊथहॅम्पटनला सामन्यादरम्यान भेटला होता. रहाणे सारखेच पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, पुजारा, मयंक अग्रवाल हे फलंदाजही कौंटी खेळायला एक तर आले आहेत किंवा यायच्या मार्गावर आहेत. तेव्हा बदली खेळाडूचा पर्याय भरपूर उपलब्ध आहे; पण बदली खेळाडू आपण जर बोलावला तर शिखर धवन विश्‍वचषकाच्या बाहेर जाईल. त्याला पुन्हा संघात घ्यायचे असेल तर दुसरा कुणी खेळाडू दुखापतग्रस्त झाला तरच येता येईल; पण या दुसर्‍या खेळाडूच्या दुखापतीला आयसीसीच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली तरच हा दुसरा बदल संभवतो.

आयसीसीच्या या नियमांचा विचार केला तर धवनला विश्‍वचषकाबाहेर पाठवायच्या आधी सर्व शक्यतांचा विचार करावा लागेल. कुठच्याही संघाला जर उपांत्य फेरी गाठायची असेल तर कमीतकमी सहा सामने जिंकावे लागतील. आपले दोन तर जिंकून झाले आहेत. बांगला देश, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांविरुद्ध आपण विजय मिळवण्याची दाट शक्यता आहे. तेव्हा उरतात ते आज होणारा न्यूझीलंडविरुद्ध, पाकिस्तान आणि इंग्लंडचे सामने. यातल्या न्यूझीलंड आणि पाकिस्तानच्या सामन्याचा निकाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण धवनच्या बदलीचा निर्णय घेणार नाही असे दिसते. हे दोन्ही सामने आपण जिंकले तर आपला उपांत्य फेरीचा मार्ग जवळजवळ निश्‍चित असल्याने आपण बदली न घेता धवनला उपांत्य फेरीपर्यंतही विश्रांती देऊ शकतो.

इंग्लंडमध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. तेव्हा पावसाने जर गोंधळ घातला तर गुणतक्‍ता कसाही बदलू शकतो. भारत आणि न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे सावट आहे. लंडनहून मी नॉटिंगहॅमला पोहोचलो तर स्वागताला पाऊस आहेच. आजही पावसाची शक्यता सत्तर टक्के आहे. सामना कमी षटकांचा व्हायचीही शक्यता आहे. वेस्ट इंडिजच्या जलदगती गोलंदाजांना इथे मिळालेला बाऊन्स बघता आणि पारंपरिक पद्धतीने हे स्विंग गोलंदाजीला पोषक मैदान आणि ढगाळ वातावरण असता नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी घ्यायला दोन्ही संघ उत्सुक असतील. डकवर्थ लुईसची टांगती तलवार असताना लक्ष्य किती हवे हे माहीत असणे लक्ष्य देण्यापेक्षा जास्त पसंत केले जाईल.

धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा आणि राहुलला हेन्‍री आणि बोल्टच्या वेग आणि  स्विंगचा सामना करत उत्तम सलामी द्यावी लागेल. राहुलला बढती मिळाल्याने मधल्या फळीत दिनेश कार्तिक किंवा विजय शंकर यापैकी एकाची वर्णी लागेल. आतापर्यंत अपराजित असलेल्या या दोन संघांत पूर्ण सामना होऊन द्यायला सूर्यप्रकाश का पाऊस हा ‘टॉस’ मात्र आज देवाच्या हातात आहे.

दिनेश की शंकर?

गेल्यावर्षी नॉटिंगहॅम कसोटीत हार्दिक पंड्याने उत्तम गोलंदाजी करून आपल्याला विजय मिळवून दिला होता. कसोटी आणि एक दिवसीय क्रिकेटमध्ये फरक असतो हे मान्य असले तरी पंड्या इथे दहा षटके टाकू शकेल तेव्हा फलंदाजीत कांकणभर सरस आणि अनुभवी असलेल्या दिनेश कार्तिकची वर्णी लागू शकते. 

कभी महक की तरह हम
    गुलों से उड़ते हैं,
कभी धुएं की तरह 
    पर्बतों से उड़ते हैं,
ये कैंचियां हमें उड़ने से
    खाक रोकेंगी,
के हम परों से नहीं
    हौसलों से उड़ते हैं.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात जखमी झालेला शिखर धवन संघातून बाहेर होणार नाही. शिखर पुढचे काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली इंग्लंडमध्येच थांबणार आहे. तो स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात काही सामन्यांमध्ये खेळावा यासाठी बीसीसीसीआय प्रयत्न करीत आहे. स्वत: शिखर धवनही परिस्थितीला शरण गेलेला नाही. या दुखापतीतून आपण लवकर बाहेर पडू, असा आशावाद त्याला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्याने एक संदेश पोस्ट केला आहे. प्रख्यात शायर राहत इंदौरी यांच्या ‘हम परों से नहीं हौसलों से उड़ते हैं’ या चार ओळी ट्विटर अकाऊंटवर टाकत, मी अजूनही धीर सोडलेला नसल्याचे त्याने म्हटले आहे.

शंकरला संधी मिळण्याचे बांगर यांचे संकेत

सलामीवीर शिखर धवन अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे सध्या विश्‍वचषक स्पर्धेतून काही काळ बाहेर गेला आहे. भारतीय संघासमोर पुढे आज न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. या सामन्यात दिनेश कार्तिक किंवा शिखर धवन यापैकी कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे; पण शिखर धवनच्या अनुपस्थितीत अष्टपैलू विजय शंकरला संघात जागा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघाचे साहाय्यक प्रशिक्षक संजय बांगर यांनी असे संकेत दिले आहेत. बांगर यांनी सांगितले की, आम्ही शिखरच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहोत. डॉक्टरांची टीम त्याची काळजी घेत आहे. दुखापतीमधून सावरायला त्याला किमान 10 ते 12 दिवस लागतील. यादरम्यानच्या काळात गरजेनुसार विजय शंकरचा विचार केला जाऊ शकतो.

दक्षतेचा उपाय म्हणून ऋषभ पंत इंग्लंडला

‘विश्‍वचषक-2019’मध्ये दुसर्‍याच सामन्यांत बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक फटकावणार्‍या ‘गब्बर’ शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर ठेवण्यात येणार आहे. धवननंतर संघात त्याच्या जागी पर्याय म्हणून यष्टिरक्षक ऋषभ पंत दाखल होत आहे. भारतीय टीमचा ‘बॅकअप’ म्हणून पंत इंग्लंडला रवाना झाला आहे. धवन विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर झालेला नाही. तरीही दक्षतेचा उपाय म्हणून बीसीसीआयने ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये पाठवले आहे.