होमपेज › Sports › द. आफ्रिकेचा त्रिशतकी विजय 

द. आफ्रिकेचा त्रिशतकी विजय 

Published On: Jul 18 2017 12:33AM | Last Updated: Jul 18 2017 12:27AM

बुकमार्क करा


नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था 

दुसर्‍या कसोटीत द. आफ्रिकेने इंग्लंडचा 340 धावांनी धुव्वा उडवून तीन लढतींच्या मालिकेत 1-1 बरोबरी साधली.  ही कसोटी वाचवण्यासघठी 474 धावांचे टोलेजंग टार्गेट असलेला यजमानांचा संघ चौथ्या दिवशी उपहारानंतरच 44.4 षटकात 133 धावांत गारद झाला. फिरकीपटू केशव महाराज आणि वेगवान गोलंदाज व्हेरनॉन फिलेंडर यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. 

उपाहारापर्यंत 4 बाद 79 अशी दारुण अवस्था झालेल्या इंग्लंडने त्यानंतर उर्वरित सहा विकेट 54 धावांत गमावल्या. सर्वाधिक 42 धावांची खेळी सलामीवीर अ‍ॅलेस्टर कुकने केली. एकूण सात फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. 

पहिल्या डावात 335 धावा करणार्‍या द. आफ्रिकेने इंग्लंडला पहिल्या डावात 205 धावांत गुंडाळले होते. 130 धावांची आघाडी घेतलेल्या पाहुण्यांनी आपला दुसरा डाव तिसर्‍या दिवसअखेर 9 बाद 343 धावांवर घोषित केला होता. दुसर्‍या डावातही  इंग्लंडचा प्रारंभ खराब झाला. जिनिंग्ज (3), गॅरी बॅलन्स (4) आणि कर्णधार जो रूट (8) यांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. 79 पैकी 42 धावा अ‍ॅलेस्टर कूकने केल्या; पण उपाहारापूर्वीच्या षटकात मॉरिसने त्याची विकेट घेत इंग्लंडला चौथा धक्‍का दिला. 

तत्पूर्वी, तळाचा फलंदाज फिलेंडरने 42 धावा करून द. आफ्रिकेला 300 चा टप्पा पार करून दिला. 1 बाद 73 वरून पुढे खेळणार्‍या द. आफ्रिकेकडून डॅन एल्गर (80), हाशीम अमला (87) आणि बाऊमा (63) यांनी अर्धशतके साजरी केली.