Wed, May 22, 2019 20:57होमपेज › Sports › यजमान विजयी सलामी देणार?

यजमान विजयी सलामी देणार?

Published On: Jun 14 2018 1:37AM | Last Updated: Jun 13 2018 11:12PMमॉस्को : वृत्तसंस्था 

यजमान रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील लढतीत बुधवारी 21 व्या वर्ल्डकपचा बिगुल वाजणार आहे. ही लढत जिंकून विजयी सलामी देण्यासाठी यजमान रशिया उत्सुक असला, तरी सौदी अरेबियाही कडवी लढत देईल, अशी अपेक्षा आहे. यंदाच्या स्पर्धेतील सर्वात कमकुवत समजल्या जाणार्‍या संघादरम्यान लढतीने वर्ल्डकपचा प्रारंभ होत आहे. 

या दोन्ही संघांची बाद फेरीत प्रवेश करण्याची शक्यता खूपच कमी आहे.लुझान्की स्टेडियमवर होणार्‍या या लढतीपूर्वी वर्ल्डकपचा रंगतदार उद्घाटन सोहळादेखील रंगणार आहे. रशियाने 2002 मध्ये शेवटचा विजय साजरा केला होता, तर सौदी अरेबियाने वर्ल्डकपमधील शेवटचा विजय 1994 साली साजरा केला होता.

यजमान असल्यामुळे यावेळी रशियाला पात्रता फेरीत खेळावे लागले नाही. 2008 नंतर एकाही वर्ल्डकपमध्ये ते बाद फेरी गाठू शकलेले नाहीत. इतकेच नव्हे, तर यंदा प्रशिक्षक आणि खेळाडूंमध्येही वाद असल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी सलग पाच आंतरराष्ट्रीय सामने गमावल्यानंतर त्यांनी ऑक्टोबरमध्ये द. कोरियाविरुद्ध विजय साजरा केला. दुसरीकडे, वर्ल्डकपसाठी पात्र ठरल्यानंतर सौदी अरेबियानेही दोन प्रशिक्षक बदलले आहेत. 

भारताचे दोन चिमुकले ‘मैदानात’ 

भारतीय फुटबॉल संघाला वर्ल्डकपची दारे कधी खुली होतील हे माहिती नाही; मात्र भारतीय मुलांना मैदानावर येण्याची संधी मिळणार आहे. कर्नाटकचा दहा वर्षीय ऋषी तेज आणि तामिळनाडूचा 11 वर्षीय नथानिया जोन्स या दोन मुलांना यंदाच्या विश्‍वचषकात अधिकृत मॅच बॉल कॅरिअर म्हणून निवडण्यात आले आहे. बेल्जियम वि. पनामा आणि ब्राझील वि. कोस्टारिका अशा दोन सामन्यांमध्ये ही संधी देण्यात आली आहे.