होमपेज › Sports › ऋषभ, विजय, अजिंक्य ‘वर्ल्डकप’च्या शर्यतीत

ऋषभ, विजय, अजिंक्य ‘वर्ल्डकप’च्या शर्यतीत

Published On: Feb 12 2019 1:14AM | Last Updated: Feb 11 2019 8:11PM
नवी दिल्‍ली : वृत्तसंस्था

इंग्लंडमध्ये होणार्‍या आगामी विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची बांधणी करण्यात येत आहे. सध्या 20 खेळाडूंना अजमावून पाहिले जात असून, त्यातील 15 जण अंतिम संघात असतील, असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले. ऋषभ पंत, विजय शंकर या नवोदित खेळाडूंबरोबरच अजिंक्य रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूलाही यात संधी मिळू शकते, असे सूतोवाच त्यांनी केले. त्याचबरोबर लोकेश राहुलला पुरेशी संधी मिळूनही तो अपयशी ठरल्याने वर्ल्डकप संघात तो नसेल, असे संकेत प्रसाद यांनी दिले.

‘ऋषभ पंतचा एकदिवसीय विश्‍वचषकासाठी विचार केला जात आहे. गेल्या एका वर्षात त्याने प्रचंड मेहनत घेतली असून, अतिशय चांगली कामगिरी केली आहे. तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. फक्‍त त्याला खेळात अजून परिपक्व होण्याची गरज आहे. म्हणूनच त्याला भारत ‘अ’ संघात शक्य तितकी संधी देण्यात आली होती,’ असे प्रसाद म्हणाले.विजय शंकरबाबत बोलताना ते म्हणाले की, कोहलीच्या अनुपस्थितीत विजय शंकर तिसर्‍या क्रमांकावर खेळायला आला. त्याने केवळ गोलंदाजीच नव्हे तर फलंदाजीतही चांगली कामगिरी बजावली. वेळप्रसंगी त्याने फटकेबाजी करून भारताच्या डावाला गती दिली. त्यामुळे चौथा अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय निवड समिती त्याचा विचार करीत आहे.

‘गेल्या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत लोकेश राहुलचा सलामीवीर म्हणून संघात विचार सुरू होता. मात्र, त्याने सातत्याने अत्यंत खराब कामगिरी केल्यामुळे आता अजिंक्य रहाणेचा या स्थानासाठी विचार सुरू आहे. अजिंक्यने बराच काळापासून टीम इंडियाकडून एकदिवसीय सामना खेळला नसला, तरी भारत ‘अ’ संघाकडून त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे सलामीच्या स्थानासाठी तो या शर्यतीत नक्‍कीच असेल, असेही प्रसाद यांनी स्पष्ट केले आहे.

विश्‍वचषकासाठी सर्वप्रथम 20 खेळाडूंची यादी काढण्यात येणार आहे. टीम इंडियामध्ये सध्या प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे विश्‍वचषक स्पर्धेसाठी कोणते 15 खेळाडू निवडले जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.