Sun, Jan 19, 2020 17:12होमपेज › Sports › यू मुंबा, बंगळुरु बुल्सची विजयी सलामी  

यू मुंबा, बंगळुरु बुल्सची विजयी सलामी  

Published On: Jul 20 2019 10:31PM | Last Updated: Jul 20 2019 10:31PM
हैदराबाद : पुढारी ऑनलाईन 

हैदराबाद येथे सुरु झालेल्या प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामात सलामीच्या सामन्यातच गतविजेत्या बंगळुरु बुल्सला पटना पायरेट्सने चांगलेच झुंजवले. पण, अखेर बंगळुरु बुल्सने अवघ्या २ गुंणाच्या फरकाने पटना पायरेट्सला मात देत विजयी सलामी दिली. बंगळुरु बुल्सचे ३४ तर पटना पायरेट्सचे ३२ गुण झाले. तर दुसऱ्या सामन्यात यू मुंबाने तेलगू टायटन्सचा ३१-२५ असा पराभव करत आपले विजयाचे खाते पहिल्याच सामन्यात उघडले. 

प्रो कबड्डीच्या सातव्या हंगामाची धामाकेदार सुरुवात झाली आहे. बंगळुरु बुल्स आणि पटना पायरेट्स यांच्यात झालेला सलामीचा सामना चुरशीचा झाला. दोन्ही संघाच्या रेडर्सनी तुल्यबळ कामगिरी करत सामन्यात रंगत भरली. बंगळुरु बुल्सकडून पवन कुमारने ८ रेड पॉईंट्स आणि १ बोनस गुण मिळवत सर्वाधिक ९ गुण मिळवले होते. तर पटना पायरेट्सकडून प्रदीप नरवालनेही ८ रेड पॉईंट आणि २ बोनस गुण मिळवले होते. पण, सामन्यात निर्णायक ठरले ते टॅकल पॉईंट्स बंगळुरु बुल्सने पटना पायरेट्सच्या रेडर्सना टॅकल करण्यात सरस कामगिरी करत १५ टॅकल पॉईंट मिळवले तर पटनाला फक्त १२ गुण मिळवता आले. त्यामुळे पहिल्या हाफमध्ये १७-१३ अशी ४ गुणांची आघाडी मिळवनही ही आघाडी दुसऱ्या हाफमध्ये कायम ठेवता आली नाही. त्यामुळे त्यांचा ३४-३२ अशा दोन पॉईंट्सच्या फरकाने पराभव झाला.   
 
त्यानंतर झालेल्या दुसऱ्या सामन्यात यू मुंबाने तेलगु टायटन्सचा ३१-२५ असा सहा गुणाच्या फरकाने पराभव करत आपले विजयाचे खाते पहिल्याच सामन्यात उघडले. यू मुंबाने तेलगु टायटन्सला स्टार रेडर सिद्धार्थ देसाईला रोखण्यात चांगले यश मिळाले. त्यामुळे त्याला फक्त ४ रेड पॉईंट मिळवता आले. तर दुसऱ्या बाजूला यू मुंबाच्या अभिषेक सिंहने १० रेट पॉईंट मिळवले. यू मुंबा आणि तेलगु टायटन्सचे टॅकल पॉईंट समान (१०-१०) होते. पण, यू मुंबाला विजय मिळवून दिला तो ४ ऑल आऊट पॉईंट्सनी त्यामुळेच यू मुंबाला तेलगु टायटन्सवर ३१-२५ अशी मात करता आली.