पुढील वर्षी महिला आयपीएल  व्हावे : मिताली राज

Last Updated: Mar 26 2020 9:15PM
Responsive image
भारताची माजी कर्णधार मिताली राज


नवी दिल्ली : वृत्तसंस्था

‘आता बीसीसीआयने महिला आयपीएल सुरुवात करण्याबाबत आणखीन वाट पाहू नये,’ असे भारताची माजी कर्णधार मिताली राज म्हणाली. ‘यासोबतच बोर्डाने छोट्या स्वरुपात पुढील वर्षी महिला आयपीएल आयोजित करावे,’ असे तिने सांगितले. ‘मला व्यक्तीश: वाटते की त्यांनी महिला आयपीएल पुढील वर्षी सुरू करावे. मग ते छोट्या स्तरावर असो किंवा त्यामध्ये काही नियम बदलले असोत,’ असे मिताली म्हणाली. भारताला महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात पराभूत व्हावे लागले. त्यावेळी माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी पुढील वर्षापासून युवा कौशल्यांना वाव देण्यासाठी महिला आयपीएल सुरू करावे असे म्हटले होते.

2019 मध्ये आयपीएल वेलोसिटी, आयपीएल ट्रेलब्लेझर्स आणि आयपीएल सुपरनोव्हाज या तीन संघांसह महिला स्पर्धा पार पडली होती. यावर्षी बीसीसीआय पुरुष आयपीएलच्या ‘प्ले ऑफ’च्या समांतर चार संघांच्या महिला टी-20 चॅलेंजच्या आयोजनाचा विचारात होती; पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएल पुढे ढकलण्यात आले आहे. भारताकडे पूर्ण आयपीएलचे आयोजन करण्याइतपत म्हणाव्या इतक्या महिला क्रिकेटपटू नाहीत. मात्र, मितालीच्या मते सध्याच्या आयपीएल फ्रेंचाईझींपैकी काही जणांनी संघ घेतल्यास हे शक्य होऊ शकेल.

‘आपल्या स्थानिक महिला क्रिकेटमध्ये म्हणावे तसे खेळाडू नसले तरीही बीसीसीआय चार संघांसोबत महिला टी-20 चॅलेंजच्या आयोजनाच्या तयारीत होती. तसेच, सध्याच्या आयपीएल संघांपैकी काही आणखीन संघ पुढे आल्यास ते शक्य आहे. तुम्ही अधिक काळ वाट पाहू शकत नाही. कधी ना कधी ते सुरू करावेच लागेल. आता अधिक परदेशी खेळाडू घेतले तरीही भविष्यात जाऊन त्यांची संख्या तुम्ही चारवर आणू शकता, असे मिताली म्हणाली. ‘महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करणार्‍या शेफाली वर्माला एकदिवसीय संघातदेखील संधी देण्यास हरकत नाही. ती युवा आहे. तिच्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ती युवा असली तरीही याचा अर्थ असा नाही की तिला एकदिवसीय संघात स्थान मिळू शकत नाही,’ असे मितालीने सांगितले.