Mon, Mar 25, 2019 21:25होमपेज › Sports › शमीचा मोबाईल जप्त; फार्महाऊस वादाचे मुळ कारण?

शमीचा मोबाईल जप्त; फार्महाऊस वादाचे मुळ कारण?

Published On: Mar 13 2018 11:27PM | Last Updated: Mar 13 2018 11:27PMकोलकाता : वृत्तसंस्था

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. कोलकाता पोलिसांनी शमीचा मोबाईल फोन जप्त केला आहे. शमीवर आरोप करताना हसीन जहाँने शमीचे इतर मुलींसोबतच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट आपल्या फेसबूक अकाऊंटवर टाकले होते. त्यामुळे या प्रकरणात शमीच्या मोबाईलमधील कॉल डिटेल्स आणि अन्य गोष्टींचा तपास करणे गरजेचे असल्याचे कोलकाता पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यामुळे शमीच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 

आफ्रिका दौर्‍यावर असताना मोहम्मद शमी कुठे बाहेर फिरायला गेला होता का? किंवा संघासोबत नसताना तो कुठे कुठे जायचा याबद्दल माहिती घेण्यासाठी कोलकाता पोलिसांनी बीसीसीआयलाही तपशील मागवला आहे. बीसीसीआयकडून प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे कोलकाता पोलिसांचे सहपोलिस आयुक्‍त (गुन्हे) प्रवीण त्रिपाठी यांनी म्हटले आहे; मात्र कोलकाता पोलिसांनी पाठवलेल्या पत्रावर बीसीसीआयने अजूनही ठाम भूमिका घेतलेली नाही.

दरम्यान, कोलकाता पोलिसांनी, शमीची पत्नी हसीन जहाँचा दंडाधिकार्‍यांसमोर जबाब नोंदवण्याची मागणी न्यायालयासमोर केली आहे. काही दिवसांपूर्वी शमीची पत्नी हसीन जहाँने शमीचे अन्य मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. याचसोबत शमीच्या कुटुंबाकडून आपला छळ होत असून, शमीच्या भावाने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रारही हसीन जहाँने पोलिसांत दाखल केली होती. 

कोट्यवधी किमतीचे फार्महाऊस वादाचे मूळ कारण?

मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी यांच्यात सुरू असलेल्या वादाचे मूळ कारण हे उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील कोट्यवधी रुपयांचे फार्महाऊस आहे. शमीच्या निकटवर्तीयांच्या मते, शमीने अमरोहा येथील अलीनगर गावात जे फार्महाऊस विकत घेतले होते. तेथे स्पोर्टस् अकादमी सुरू करण्याची त्याची इच्छा आहे. हसीनला मात्र शमीचा हा निर्णय फारसा मान्य नव्हता. हसीनला अमरोहाऐवजी पश्‍चिम बंगालमध्ये मालमत्ता विकत घ्यायची होती. शमीने 60 एकरांची जमीन विकत घेतली. या जमिनीचा बाजारभाव साधारणपणे 12 ते 15 कोटी रुपयांपर्यंत होतो. शमीने त्याच्या फार्महाऊसचे नाव पत्नीच्या नावेच ठेवले आहे; पण कायदेशीररीत्या या जागेवर हसीनचा कोणताही अधिकार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरोहामध्ये मालमत्ता विकत घेतल्यानंतरच शमी- हसीनच्या सुखी संसारात वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली. शमीची जन्मभूमी अमरोहा आहे; पण तो सध्या पश्‍चिम बंगालकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो. शिवाय, हसीनही कोलकाताची राहणारी आहे.