Tue, Jul 07, 2020 07:40होमपेज › Sports › विंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; दोन नव्या चेहऱ्यांना संधी

विंडीज दौऱ्यासाठी दोन नव्या चेहऱ्यांना संधी

Published On: Jul 21 2019 2:22PM | Last Updated: Jul 21 2019 2:59PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज (ता.२१) करण्यात आली. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० तिन्ही प्रकारात कर्णधार पदाची जबाबदारी विराट कोहलीकडेच कायम आहे. एकदिवसीय आणि टी-२० साठी रोहित शर्मा तर कसोटीसाठी अजिंक्य रहाणेला उपकर्धार करण्यात आले आहे. या दौऱ्यात तिन्ही संघांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

महेंद्रसिंह धोनीने पुढील दोन महिने संघ निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे तिन्ही प्रकारात यष्टीरक्षक रिषभ पंतची वर्णी लागली आहे. त्यामुळे त्याला आगामी विंडीज दौरा आव्हानात्मक असणार आहे. कर्णधार विराट कोहली तिन्ही प्रकारामध्ये संघ नेतृत्व करणार आहे. 

लेग स्पिनर राहुल चहर आणि नवदीप सैनी हे दोन नवीन चेहरे आहेत. राहुल चहरचा टी-२० मध्ये समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, दिनेश कार्तिकला एकदिवसीय तसेच टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. वर्ल्डकपमध्ये सुमार कामगिरी केलेला केदार जाधव संघातील स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला. 

मनीष पांडे आणि श्रेयस अय्यरने एकदिवसीय आणि टी-२० संघात पुनरागमन केले आहे. वर्ल्डकपमध्ये जखमी झालेल्या शिखर धवननेही संघात पुनरागमन केले आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहला एकदिवसीय आणि टी-२० संघातून विश्रांती देण्यात आली. अष्टपैलू हार्दिक पांड्याला सुद्धा संपूर्ण दौऱ्यातून विश्रांती देण्यात आली आहे. रिषभ पंतला तिन्ही प्रकारात संधी मिळाल्याने विश्वास सार्थ ठरविण्याची जबाबदारी त्याच्यावर असणार आहे.

भारतीय संघामध्ये राहुल चहर आणि नवदीप सैनी हे दोन चेहरे आहेत. दिपक चहर आणि राहुल चहर दोन नात्याने भाऊ आहेत. वृद्धिमान साहाची कसोटी संघात वर्णी लागली आहे. 

टी-२० संघ पुढीलप्रमाणे :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत(विकेटकीपर), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर,  भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी. 

एकदिवसीय संघ पुढीलप्रमाणे :  विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत(विकेटकीपर), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवेनश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी. 

दोन कसोटी सामन्यांसाठी संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, रिषभ पंत (विकेटकीपर), वृद्धिमान साहा (विकेटकीपर), आर. आश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह, उमेश यादव