Thu, Mar 21, 2019 00:56होमपेज › Sports › 360° चेंडू.. पण, हा डेड बॉल देण्याचे कारण काय? (viral video) 

360° चेंडू.. पण, हा डेड बॉल देण्याचे कारण काय? (viral video) 

Published On: Nov 09 2018 5:13PM | Last Updated: Nov 09 2018 5:13PMनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

गेल्या महिन्याभरात क्रिकेट जगतातील काही फनी व्हिडिओनीं सोशल मीडियावर चांगलाचा धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामन्यात अझर अली विचित्र आणि हास्यास्पद पध्दतीने धावबाद झाला होता. त्यानंतर असाच एक धावबाद होण्याचा न्यूझीलंडमधील व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता. आता भारतातील डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाचाही एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

कल्याणी येथे सी. के. नायडू ट्रॅाफीत उत्तर प्रदेश आणि बंगाल विरुध्द सामना सुरु होता. या सामन्यात उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग याने एक विचित्र चेंडू टाकला. त्याने चेंडू टाकण्याच्या क्षणी स्वतः भोवती ३६० अंश गिरकी मारली आणि मग चेंडू टकाला. आतापर्यंत अशा प्रकारे कोणीही चेंडू टाकला नव्हता. पंचानी लगेचच हा ‘डेड बॉल’ असल्याचा इशारा दिला. या निर्णयावर वर नाराज झालेले उत्तर प्रदेशचे खेळाडू पंचांशी हुज्जत घालू लागले. पण, पचांनी ‘डेड बॉल’ देण्याचे कारण स्पष्ट केल्याने युपीच्या खेळाडूंचा राग शांत झाला. 

आपणाला असे वाटत असेल की चेंडू टाकतेवेळी मारलेल्या गिरकीमुळे हा वैध चेंडू नाही. त्यामुळे पंचांनी हा चेंडू ‘डेड बॉल’ असल्याचा इशारा केला. पण, ‘डेड बॉल’ देण्याचा आणि अवैध्य चेंडूचा नियम याचा काही संबंध नाही. जर अवैध्य चेंडू असता तर पंचांनी ‘नो बॉल’ दिला असता. हा ‘डेड बॉल’ दिला कारण तो क्षेत्ररक्षणाच्या नियमाचे  ( ४१.४.२) उल्लंघन करत होता. चेंडू टाकत असताना एखाद्या क्षेत्ररक्षकाने फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी जाणून बुजून कोणतीही कृती केली तर तो चेंडू ‘डेड बॉल’ देण्यात येतो. पंचांच्या मते गोलंदाजाचा गिरकी मारण्याचा प्रयत्न हा फलंदाजाची एकाग्रता भंग करण्यासाठी होता. 

या व्हायरल व्हिडिओमुळे क्रिकेट वर्तुळात अणखी एका चर्चेला तोंड फुटले आहे. जर का फलंदाज आपला स्टान्स बदलून स्विच हिट मारु शकतो कसाही स्टान्स घेऊन गोलंदाजाची एकाग्रता भंग करण्याचा प्रयत्न करु शकतो. त्याला ‘युनिक स्टाईल’ म्हणून मान्याता मिळते. मग गोलंदाजाने असे केल्यावर तो चेंडू बाद का ठरवला जातो? आस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेलीचाही असाच विचित्र स्टान्स घेतलेला व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता.