Thu, Jul 16, 2020 00:14होमपेज › Sports › जडेजा, उमेेशची फटकेबाजी; दिवस अखेर भारताकडे 343 ची आघाडी

जडेजा, उमेेशची फटकेबाजी; दिवस अखेर भारताकडे 343 ची आघाडी

Last Updated: Nov 15 2019 5:19PM
इंदूर : पुढारी ऑनलाईन

भारत आणि बांगलादेश यांच्यात इंदुर येथे  होत असलेल्या पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस मयांक अग्रवालने गाजवला. आतापर्यंत फक्त 8 कसोटी सामने खेळणाऱ्या मयांकने आपले दुसरे द्विशतक ठोकले. त्याच्या या द्विशतकच्या जोरावर भारताने पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी 6 फलंदाजांच्या मोबदल्यात 493 धावांपर्यंत मजल मारली. मयांकबरोबरच अजिंक्यने 86 धावांची तर रविंद्र जडेजाने नाबाद 60 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्यामुळे भारताकडे दुसऱ्या दिवसअखेर 343 धावांची आघाडी आहे.

दुसऱ्या दिवशी भारताची अवस्था 3 बाद 119 धावा अशी झाली. पण, त्यानंतर जम बसलेल्या सलामीवीर मयांक अग्रवाल आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेने भारताची आणखी पडझड होऊ दिली नाही. दोघांनीही भारताचा धावफलक हलता ठेवला. मयांकने आपल्या कसोटी कराकिर्दितील 3 शतक झळकावले. त्यानंतर काही वेळाने अजिंक्यनेही आपले 21 वे अर्धशतक पूर्ण केले. पण, शतकाच्या जवळ येत अजिंक्य पुन्हा एकदा बाद झाला. त्याला अबू जायेदने 86 धावांवर बाद केले.  अजिंक्य बाद झाल्यानंतर डावाची सर्व सुत्रे मयांकने आपल्या हातात घेत द्विशतक ठोकत भारताला 400 धावांच्या पार पोहचवले. त्याने आपले दुसरे द्विशतक षटकाराने पूर्ण केले. अजिंक्यनंतर जडेजाने त्याला चांगली साध देत होता. त्यामुळे मयांक 250 धावा ठोकणार असे वाटत होते पण, मेहंदी हसनने त्याला 243 धावांवर बाद केले.

मयांक बाद झाल्यानंतर आलेला वृद्धीमान सहाही फक्त 12 धावांची भर घालून माघारी परतला. त्यामुळे भारताचे 454 धावात 6 फलंदाज बाद झाले. वृद्धीमान सहा बाद झाल्याने आता गोलंदाजच उरले होते. त्यामुळे रविंद्र जडेजाने आक्रमक फलंदाजी करत जास्तीजास्त धावा करण्याची स्ट्रेटजी वापरली. दरम्यान, त्याने आपले अर्धशतकही पूर्ण केले. दुसऱ्या बाजूने त्याला उमेश यादवने तडाखेबाज फलंदाजी करत चांगली साथ दिली. त्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर भारताने 493 धावांपर्यंत मजल मारली. भारताकडे आता 343 धावांची आघाडी आहे.