Thu, Jul 18, 2019 04:52होमपेज › Sports › ऑस्ट्रेलियाचाही डाव गडगडला; दिवसअखेर ७ बाद १९१ धावा

ऑस्ट्रेलियाचाही डाव गडगडला; दिवसअखेर ७ बाद १९१ धावा

Published On: Dec 07 2018 7:47AM | Last Updated: Dec 07 2018 1:26PM
ॲडलेड : पुढारी ऑनलाईन 

ॲडलेडच्या ओव्हल मैदानावर सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी काल केलेल्या २५० धावांमध्ये भारत एकाही धावेची भर घालू शकला नाही. त्यामुळे भारताच्या पहिल्या डावात २५० धावाच झाल्या. पण, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना सादर करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. भारताने दुसऱ्या दिवस अखेर कांगारुंचे १९१ धावात ७ फलंदाज माघारी धाडले. चहापानानंतर कांगारुंच्या फलंदाजांनी विशेषतः ट्रॅविस हेडने झुंजात अर्धशतक करत भारतीय गोलंदाजांचा चांगला प्रतिकार केला. पण, ऑस्ट्रेलिया अजूनही ५९ धावांनी मागे आहे आणि त्यांच्याकडे फक्त ३ फलंदाज शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उद्या भारत कांगारुंची शेपूट कमी धावात गुंडाळून चांगली आघाडी घेण्याच्या प्रयत्न करेल. तर ऑस्ट्रेलियाचा भारताच्या धावसंख्याच्या जितके जवळ जाता येईल तितके जाण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे तिसऱ्या दिवशी कांगारुं आक्रमक फलंदाजी  करण्याची शक्यता आहे. 

पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. इशांत शर्माने पहिल्या षटकाच्या तिसऱ्याच चेंडूवर ॲरोन फिंचचा त्रिफळा उडवत कांगारुंना शून्यावर पहिला धक्का दिला. परंतु त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजा आणि सलामीवीर मार्कस हॅरिसने अत्यंत सावध फलंदाजी केली. जवळपास २० षटकात फक्त ४५ धावा करणाऱ्या कांगारुंना फिरकी गोलंदाज आर अश्विनने दुसरा धक्का दिला. त्याने हॅरिसला २६ धावांवर बाद केले. लंचसाठी खेळ थांबला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या २७ षटकात २ बाद ५७ धावा झाल्या होत्या. 

लंचनंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाज अश्विनने चांगलेच दमवले. पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नेथल लायनचा चेंडू फिरकी घेत होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी अश्विन कांगारुंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवणार असा अंदाज होता. लंचनंतर अश्विनने धावांसाठी झगडत असलेल्या शॉन मार्शला २ धावांवर बाद करत कांगारुंना तिसरा धक्का दिला. त्यानंतर अश्विनने बराचवेळ खेळपट्टीवर ठाण मांडून बसलेल्या उस्मान ख्वाजाला उकृष्ट फिरकी घेणारा चेंडू टाकत पंत करवी झेलबाद केले. यामुळे ४० षटकांच्या खेळानंतर ८७ धावात ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज तंबूत परतले होते. मार्श आणि ख्वाजा बाद झाल्यानंतर अडचणीत सापडलेल्या ऑस्ट्रेलियाला सावरण्याची जबाबदारी पीटर हॅडस्कब आणि ट्रॅविस हेडवर आली. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारत चहापानापर्यंत तरी ऑस्ट्रेलियाची आणखी पडझड होऊ दिली नाही. चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने ५५ षटकात ४ बाद ११७ धावा केल्या होत्या. 

चहापानानंतर ट्रॅविस हेड आणि हँडस्कब यांनी एका मोठ्या भागिदारीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली. पण, या दोघांनी ३३ धावांची भागिदारी केली असताना हँडस्कब ३४ धावांवर बाद झाला आणि भारतासाठी डोकेदुखी ठरणारी जोडी फुटली. बुमराहने ही जोडी फडली. त्यानंतर आलेला टिम पेनेही ५ धावांची भर घालून बाद झाला. दरम्यान, एकाकी झुंज देणाऱ्या ट्रेविस हेडने कसोटीतील आपले दुसरे अर्धशतक पूर्ण केले. पेने बाद झाल्यावर आलेल्या पॅट कमिन्सनेही हेडची साथ लगेचच सोडली. १० धावांवर असताना त्याला बुमराहने पायचीत केले.  कसोटीचा दुसरा दिवस संपण्यास काहीच षटके शिल्लक असताना आलेल्या स्टार्कने ती षटके खेळून काढली. त्यामुळे भारताला कांगारुंची शेपूट गुंडाळण्याची संधी मिळाली नाही. दिवस अखेर ऑस्ट्रेलियाने ७ बाद १९१ धावा केल्या. हेडने एकाकी झुंज देत नाबाद ६१ धावांची खेळी केली आहे. ऑस्ट्रेलिया अजूनही ५९ धावांनी मागे आहे. त्यामुळे आता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारत किती धावात कांगारुंची शेपूट गुंडाळतो हे पहावे लागेल.  

भारताकडून फिरकीपटू आर. अश्विनने प्रभावी मारा करत ३३ षटकात ५० धावा देत ३ बळी घेतले. त्याला इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी २ बळी घेत चांगली साथ दिली. तर मोहम्मद शामीला १६ षटकात एकही बळी मिळवता आलेला नाही.

फिंचचा त्रिफळा आणि विराटचे सेलिब्रेशन Video