होमपेज › Sports › AUSvsIND : पुजाराचे झुंजार शतक; दिवसअखेर २५० धावा

पुजाराचे झुंजार शतक; दिवसअखेर २५० धावा

Published On: Dec 06 2018 7:44AM | Last Updated: Dec 06 2018 4:02PM
ॲडलेड : पुढारी ऑनलाईन

भारताने ऑस्ट्रेलियातील पहिल्याच कसोटी सामन्यात इंग्लंडमधला कित्ता इथेही गिरवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या कागदी घोड्यांनी पुन्हा नांग्या टाकल्या. अवघ्या ८६ धावात निम्मा संघ माघारी पोहचला होता. त्यानंतर राहुल द्रविडचा वारसदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराने एकाकी किल्ला लढवत भारताला २५० धावांपर्यंत पोहचवले. त्याने १२३ धावांची झुंजार शतकी खेळी केली. रोहित शर्मा(३७), पंत (२५) आणि अश्विनने (२५) यांनी पुजाराबरोबर छोट्या छोट्या भागिदारी केल्या. पण, त्यांना मोठी भागिदारी करण्यात अपयश आले. भारताने मोक्याच्या क्षणी विकेट गमावल्या. अखेर दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या ९ बाद २५० धावा झाल्या होत्या. त्यामुळे आता भारत उद्या किती धावांची भर घालतो हे पाहवे लागेल. पहिल्याच दिवशी नॅथन लायनचा चेंडू चांगाला फिरत असल्याने उद्या भारताचा अश्विन खेळपट्टीचा कसा फायदा उठवतो याच्यावर भारताचे सामन्यातील भवितव्य अवलंबून आहे. 

पहिल्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिला १ तास बॉल स्विंग होत असतो त्यामुळे भारताला सावध सुरुवातीची गरज होती. परंतु भारताने या महत्वपूर्ण पहिल्या तासातच वरचे तीन फलंदाज गमावले. पृथ्वी शॉ जायबंदी झाल्यावर नशिबाने संधी मिळेलेल्या लोकेश राहुलने ही संधीही गमावली. भारताच्या अवघ्या ३ धावा झालेल्या असताना तो दुसऱ्याच षटकात हेजलवूडच्या गोलंदाजीवर फिंचकडे झेल देऊन परतला. त्या पाठोपाठ भारताचा दुसरा सलामीवीर ‘सराव’ सामन्यातील शतकवीर मुरली विजयही ११ धावा करत पॅव्हेलियनमध्ये पोहचला. विराटलाही काही खास करता आले नाही त्यानेही ३ धावा करत परतीची वाट धरली. 

भारतची ३ बाद १९ अशी बिकट परिस्थिती झाली असताना उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि पुजाराने भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न सुरु केला. या दोघांनी २० धावांची भागिदारी करत भारताला ५० धावांच्या जवळ पोहचवले. पण, हेझलवूडचा बाहेर जाणारा चेंडू फटकावण्याच्या नादात अजिंक्य बाद झाला आणि भारताला चौथा धक्का बसला. अजिंक्यने ३१ चेंडूत १३ धावा केल्या. अजिंक्य बाद झाल्यावर आलेल्या रोहितने पुजाराच्या साथीने भारताची पडझड लंच पर्यंत तरी रोखून धरली आहे. लंचपर्यंत भारताच्या ४ बाद ५६ धावा झाल्या होत्या. रोहित १५ धावांवर तर पुजारा ११ धावांवर खेळत आहेत.  

लंचनंतर रोहितने भारताची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने काही आकर्षक फटके मारले. भारताची धावगती वाढत होती. रोहितला एका बाजूने पुजाराने सावध फलंदाजी करत चांगली साथ दिली होती. पण, नेथन लायनला एक षटकार खेचल्यानंतर रोहितचे मन भरले नाही आणि त्याने त्याला दुसराही षटकार मारण्याचा प्रयत्न केला आणि हा प्रयत्न फसला. रोहित ३ षटकार आणि २ चौकारांसह ३७ धावा करुन बाद झाला. रोहित सेट होऊन बाद झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. ८६ धावांवर ५ फलंदाज माघारी गेल्यानंतर पंत मैदानावर आला. त्याची सुरुवातही अडखळत झाली. पण, नंतर त्यानेही आक्रमक पवित्रा घेत धावा वाढण्यास सुरुवात केली. त्याने १ षटकार २ चौकार ठोकत २५ धावा केल्या. परंतु तोही लायनच्या फिरकीत अडकला आणि भारताला ६ वा धक्का बसला. 

वाचा : ख्वाजाचा अप्रतिम झेल आणि विराट पॅव्हेलियनमध्ये 

दरम्यान, सावध फलंदाजी करणारा चेतेश्वर पुजारा आपल्या अर्धशतकाजवळ पोहलचा होता. त्याच्या सावध फलंदाजीमुळेच भारत आपली शंभरी पार केली. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा भारत ५६ षटकात ६ बाद १४६ धावा झाल्या होत्या. पुजाराच्या ४६ धावा तर अश्विन ५ धावा झाल्या होत्या.  

चहापानानंतर पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर पुजाराने आपली धावगती वाढवली. त्याच्या साथीला आलेल्या अश्विनने त्याला क्रिजवर थांबून साथ दिली. दोघेही भारताला २०० चा टप्पा पार करुन देतील असे वाटत असतानाच अश्विन कमिन्सच्या गोलंदाजीवर झेल देऊन परतला. अश्विन बाद झाल्यामुळे आता फक्त तळातील फलंदाज राहिले होते. दरम्यान, भारताने आपला २०० धावांचा टप्पा पार केला. त्यात मोठा वाटा हा चेतेश्वर पुजाराच्या झुंजार खेळीचा होता. 

त्यानंतर चेतेश्वर पुजाराने डावाची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली. त्याने आपल्याकडेच स्ट्राईक ठेवत भारताच्या धावसंख्येत भर घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याने आपले कसोटीतील १६ वे शतक पूर्ण केले. त्याच्या या झुंजार शतकी खेळीने भारत २५० धावांच्या जवळ पोहचला. याच बरोबर पुजाराने कसोटीतील आपल्या ५ हजार धावाही पूर्ण केल्या. 

भारताने २५० धावांचा टप्पा पार केल्यानंतर अखेर पुजाराच्या झुंजार शतकी खेळीचा अंत झाला. तो २४६ चेंडूत १२३ धावा करुन धावबाद झाला. याचबरोबर पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या ९ बाद २५० धावा झाल्या होत्या.  ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सामुहिक कामगिरी केली. स्टार्क, कमिन्स, हेजलवूड आणि लायनने प्रत्येकी दोन बळी टिपले.