Sat, Apr 04, 2020 17:29होमपेज › Sports › कसोटीतील शतकांच्या संख्येत भारत तिसरा

कसोटीतील शतकांच्या संख्येत भारत तिसरा

Last Updated: Feb 19 2020 1:19AM
- सुरेश सुतार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौर्‍यावर आहे. या दौर्‍यात भारताने टी-20 सामन्यांची मालिका 5-0 अशा फरकाने जिंकली. मात्र, तीन सामन्यांच्या वन-डे मालिकेत 0-3 असा पराभव पत्करला. यामुळे येत्या 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या दोन कसोटी सामन्यांची मालिका कोण जिंकणार? याची उत्सुकता शिगेस पोहोचली आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघ निश्चितपणे आक्रमक क्रिकेट खेळण्यावर भर देण्याची शक्यता आहे. मग समोर ट्रेंट बोल्टसारखा भेदक गोलंदाज असला तरी. मात्र, खर्‍या अर्थाने टीम इंडियामध्ये हा आक्रमकपणा बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने रुजविला. मात्र, तत्पूर्वी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभवाची धूळ चारत 1983 चा वन-डे वर्ल्डकप जिंकला होता. वर्ल्डकप उंचावून कपिल ब्रिगेडनेही भारतीय संघाला कदापि कमी लेखू नका, असा जणू इशाराच प्रतिस्पर्धी संघांना दिला होता.

टीम इंडियाच असते जेतेपदाची दावेदार
सौरव गांगुलीने रुजविलेल्या आक्रमक खेळाच्या बळावर टीम इंडियातील अनेक खेळाडूंनी विक्रमावर विक्रम रचले आहेत. यामुळेच गेल्या काही दशकांत टीम इंडियाला प्रत्येक स्पर्धेत जेतेपदाचा दावेदार मानले जाते. अलीकडच्या काळात तर भारतीय संघ विदेशी भूमीवरही प्रतिस्पर्धी संघाला पराभवाची धूळ चारत आहे. गांगुलीने दाखविलेल्या आक्रमकतेच्या मार्गावर प्रथम महेंद्रसिंग धोनी आणि आता विराट कोहली अत्यंत चांगल्या पद्धतीने वाटचाल करीत आहेत. सध्याचा भारतीय संघ कोणत्याही संघाला मग ते टी-20, वन-डे अथवा कसोटी क्रिकेटमध्ये त्यांच्याच भूमीवर पराभूत करण्याची क्षमता बाळगून आहे. टीम इंडियाच्या अनेक फलंदाजांनी नेहमीच शानदार प्रदर्शन करून संघाचे नाव उज्ज्वल करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. ही त्यांची कामगिरी त्यांच्या विक्रमातून स्पष्ट दिसते. 

कसोटीतील शतकांमध्ये इंग्लंडच टॉपवर 
टीम इंडियाचा मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचे महाशतक पूर्ण केले असले आणि विद्यमान कर्णधार विराट कोहलीही महाशतकाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. असे असले तरी कसोटीत  सर्वाधिक शतकांचा विक्रम इंग्लंड संघाच्या नावे आहे. या यादीत ऑस्ट्रेलिया दुसर्‍या तर भारत तिसर्‍या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या स्थानावर असलेल्या इंग्लंडच्या नावे कसोटीत एकूण 873 शतकांची नोंद आहे. तर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी आतापर्यंत एकूण 861 शतके झळकावली आहेत. तर भारताच्या नावे 517 शतकांची नोंद आहे. येथे एक बाब उल्लेखनीय आहे म्हणजे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने 1876-77 पासून कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. तर, भारताने सुमारे चार दशकांनंतर म्हणजे 1932 पासून कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

वन-डेमध्ये टीम इंडियाच अव्वल
भारतीय संघाने आतापर्यंत दोन वन-डे वर्ल्डकप जिंकले आहेत. मर्यादित षटकांच्या या प्रारुपात भारतीय संघाला अत्यंत भक्कम  संघ मानले जाते. या प्रारुपातील शतकांच्या आकडेवारीत भारतीय संघच नंबर वन आहे. तर दुसर्‍या स्थानावर ऑस्ट्रेलिया आणि तिसर्‍या स्थानी पाकिस्तान आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांनी वन-डेमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करताना एकूण 294 शतके ठोकली आहेत. या प्रारुपातील शतकांचे ‘त्रिशतक’ पूर्ण करण्यासाठी टीम इंडियाला आता केवळ सहा शतकांची आवश्यकता आहे. तर, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या नावे अनुक्रमे 229 व 203 शतकांची नोंद आहे.

टी-20 : भारत संयुक्तपणे पहिल्या स्थानी
गेल्या दोन दशकांच्या काळात टी-20 हे मर्यादित षटकांचे प्रारुप फारच लोकप्रिय ठरले आहे. शतकांच्या बाबतीत या प्रारुपातही टीम इंडियाच अव्वल असली तरी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडने भारताइतकीच शतके  झळकावली आहेत. या तिन्ही संघांच्या नावे प्रत्येकी सात-सात शतकांची नोंद आहे. यामुळे टी-20 तील शतकांच्या बाबतीत हे तिन्ही संघ संयुक्तपणे नंबर वनवर आहेत.

आकडेवारीत इंग्लंडच अद्याप सरस
भारत आणि इंग्लंड या संघातील शतकांच्या आकडेवारीचा विचार केल्यास यामध्ये ब्रिटिश संघच सरस ठरतो. कारण, भारताने क्रिकेटच्या तिन्ही प्रारुपात आजपर्यंत एकूण 818 शतके ठोकली आहेत. तर, इंग्लंडच्या नावे केवळ कसोटीचा विचार केला तरी या संघाने 873 शतके ठोकली आहेत. यामुळे शतकांच्या आकडेवारीत सध्या तरी इंग्लंडच सरस आहे.