होमपेज › Sports › भारताचा विजय आणि विराटची धोनीशी बरोबरी 

भारताचा विजय आणि विराटची धोनीशी बरोबरी 

Published On: Aug 26 2019 9:56AM | Last Updated: Aug 26 2019 10:48AM
अँटिग्वा : पुढारी ऑनलाईन 

भारताने वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजचा ३१८ धावांनी पराभव केला. या बरोबरच भारताने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताचा हा कसोटी सामन्यातील धावांबाबतीतला चौथा सर्वात मोठा विजय आहे. या विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहली विक्रमाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्याने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी बरोबरी साधली आहे. 

पहिल्या कसोटीत वेस्ट इंडीजचा ३१८ धावांनी पराभव करत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिला विजय मिळवला आहे. यामुळे भारताच्या खात्यात आता ६० गुण जमा झाले आहेत. भारताच्या या विजयात रहाणे सोबतच इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने मोलाची भूमिका बजावली. या विजयाबरोबर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधार म्हणून २७ वा कसोटी विजय मिळवला. त्याने आता भारताचा सर्वाधिक कसोटी विजय (२७) मिळवणाऱ्या धोनीशी बरोबरी साधली आहे. आता ३० ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून विराटला धोनीला मागे टाकण्याची संधी आहे. 

पहिल्या कसोटीच्‍या पहिल्या डावात  विराट कोहलीस फार काही करता आले नाही. विराट ९ धावा करुन बाद झाला होता. तर दुसऱ्या डावात त्याने ५१ धावा करत अर्धशतक झळकावले परंतु त्याला या अर्धशतकाचे रुपांतर शतकात करता आले नाही.