Wed, Oct 16, 2019 17:25होमपेज › Sports › भारताचा काय संबंध? पाकला श्रीलंकेच्या मंत्र्याने खडसावले 

भारताचा काय संबंध? पाकला श्रीलंकेच्या मंत्र्याने खडसावले 

Published On: Sep 11 2019 5:39PM | Last Updated: Sep 11 2019 6:18PM
कोलंबो : पुढारी ऑनलाईन 

श्रीलंकेच्या क्रिकेट संघातील जवळपास सर्वच प्रमुख खेळाडूंनी २७ सप्टेंबरपासून सुरु होण्याऱ्या पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला आहे. पण, भारताचे नाव घेतल्याशिवाय एकही घास घश्यातून उतरत नाही त्या पाकिस्तानने याचे खापर भारतावर फोडले. पाकिस्तानच्या मंत्र्याने भारताच्या धमकीमुळे या खेळाडूंनी माघार घेतल्याचा अजब कांगावा केला. याला आता श्रीलंकेचे मंत्री हरीन फर्नांडो यांनी खेळाडूंच्या माघारीत भारताचा काही संबध नाही असे सांगितले आहे. 

श्रीलंकेचा स्टार खेळाडू लसिथ मलिंगा याच्यासह १० प्रमुख खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. त्यावर पाकिस्तानचे विज्ञान मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनी भारताने धमकीमुळे लंकेचे खेळाडू माघार घेत आहेत असे वक्तव्य केले. यावर श्रीलंकेच्या क्रीडा मंत्री हरीन फर्नांडो यांनी 'लंकेचे खेळाडू पाक दौऱ्यातून माघार घेण्यामागे भारताचा हात आहे हे सत्य नाही.

काही खेळाडूंनी पाकिस्तानमध्ये घडलेल्या २००९ च्या घटनेमुळे माघार घेतली आहे. त्यांच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. जे खेळाडू पाकिस्तानात जाण्यास तयार आहेत त्यांनी घेऊन श्रीलंकेचा संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. आमचा संघ ताकदवर आहे आणि आम्ही पाकिस्तानला पाकिस्तानात हरवण्याबाबत आशावादी आहोत.' असे ट्विट केले आहे. 

२००९ ला श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता त्यावेळी लंकेच्या खेळाडूंना घेवून जात असलेल्या बसवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात लंकेचे काही खेळाडू जखमी झाले होते. त्यानंतर कोणत्याही मोठ्या संघांनी पाकिस्तानचा दौरा करणे टाळले आहे. त्यामुळे पाकिस्तानला आपली होम सिरिज त्रयस्थ ठिकाणी म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळावी लागत आहे.