Fri, May 29, 2020 00:38होमपेज › Sports › IPL : आरसीबीची विजयाची हॅटट्रिक; पंजाबवर १७ धावांनी मात

IPL : आरसीबीची विजयाची हॅटट्रिक; पंजाबवर १७ धावांनी मात

Published On: Apr 24 2019 7:47PM | Last Updated: Apr 24 2019 11:46PM
बंगळुरु : पुढारी ऑनलाईन 

तब्बल १० सामन्यांनंतर आरसीबीच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकात टिच्चून मारा करत पंजाबचा १७ धावांनी पराभव केला. अखेरच्या दोन षटकात विजयासाठी ३० धावांची गरज असताना उमेश यादव आणि सैनी या जलदगती गोलंदाजाच्या जोडगोळीने फक्त १३ धावा देत तब्बल ४ विकेट काढल्या. पंजाबकडून सर्व फलंदाजांनी सुरुवात चांगली केली पण, त्यांना मोठी खेळी करता आली नाही. पंजाबकडून निकोलस पुरनने ४६ तर राहुलने ४२ धावा केल्या.  आरसीबीने आज सलग तिसरा आणि एकूण चौथा विजय साजरा केला. या सामन्याच्या विजयाचे दोन गुण घेवून अखेर आरसीबीने पॉईंट टेबलचा तळ सोडला आता आरसीबी ८ गुणांसह सातव्या स्थानावर पोहचला आहे. 

आरसीबीच्या आक्रमक सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाबनेही चोख प्रत्युत्तर दिले. ख्रिस गेलच्या तुफानी खेळीच्या जोरावर पंजाबने तीन षटकात ४३ धावा केल्या. गेलला राहुलनेही चांगली साथ दिली पण, गेलला या चांगल्या सुरुवातीचे रुपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. उमेश यादवने त्याला २३ धावांवर बाद केले. 

गेल बाद झाल्यानंतर लोकेश राहुलने आक्रमक रुप धारण केले. त्याने मयांक अग्रवालच्या साथीन पॉवर प्लेमध्ये संघाला  ६८ धावांपर्यंत पोहचवले.  लोकेश राहुलने २७ चेंडूत ४२ धावा केल्या. त्याला मयांक अग्रवालने २१ चेंडूत ३५ धावा करुन चांगली साथ दिली. पण, त्याला मोठी खेळण्यात अपयश आले. मयांक पाठोपाठ राहुलही ४२ धावा करुन माघारी परतला त्यामुळे शंभरावर १ बाद असणाऱ्या पंजाबची अवस्था ३ बाद १०५ अशी झाली. त्यानंतर निकोलस पुरन आणि डेव्हिड मिलरने डाव सावरला. पुरनने षटकारांची बरसात केली त्यामुळे १६ व्या षटकात पंजाबच्या १५० धावा पूर्ण झाल्या. 

पंजाबला १८ चेंडूत ३५ धावांची गरज असताना उमेश यादवने षटकात फक्त ६ धावा दिल्या. या षटकात चांगल्या धावा न झाल्याने दबावात आलेला मिलर सैनीच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. सैनीने १९ व्या षटकात फक्त ३ धावा देत मिलर पाठोपाठ धोकादायक पुरनलाही बाद केले. अखेरच्या षटकात उमेश यादवने अश्विनला आणि विल्जॉनला पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत सामना आरसीबीच्या पारड्यात टाकला. अखेर बेंगलोरने पंजाबचा १७ धावांनी पराभव करत विजयाची हॅटट्रिक साधली. 

तत्पूर्वी, पार्थिव पटेलने पहिल्याच षटकात दोन चौकार मारत आक्रमक खेळणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर दुसऱ्याच षटकात शामीच्या गोलंदाजीवर विल्जोनने विराटचा कॅच सोडला. हा कॅच पंजाबला किती महागात पडणार आहे याची झलक विराटने पुढच्या दोन चेंडूवर दोन चौकार मारत दाखवून दिली. पार्थिव आणि विराटने पहिल्या ३ षटकात ३५ धावा चोपून काढल्या. पण, जीवनदान मिळालेल्या विराटला शामीने मोठी खेळी करु दिली नाही. त्याने विरटला १३ धावांवर बाद केले. 

दुसऱ्या बाजूने पार्थिव पटेलने पंजाबच्या बोलंदाजांची चांगलीच धुलाई करत आरसीबीला पॉवर प्लेमध्ये तब्बल ७० धावा करुन दिल्या. यात त्याचा वाटा ४३ धावांचा होता. या हंगामातील पॉवर प्लेमधील ही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी सरनरायझर्स हैदराबादने केकेआर विरुद्ध पॉवर प्लेमध्ये ७२ धावा केल्या होत्या. पण, पॉवर प्ले संपल्यानंतर पार्थिव पटेल लगेचच बाद झाला. त्याने २४ चेंडूत ४३ धावा चोपून काढल्या. पार्थिव बाद झाल्यानंतर लगेचच मोईन अलीही ४ धावा करुन माघारी परतला. त्यामुळे ६ षटकात १ बाद ७० धावा करणाऱ्या आरसीबीची ७.३ षटकात ३ बाद ७६ अशी अवस्था झाली.  

त्यानंतर एबी डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टॉयनिसने आरसीबीचा डाव सावला. या दोघांनी आरसीबीची नसती पडझड थांबवली नाही तर सुरुवातीला पार्थिव पटेलने सेट केलेली धावागती कायम राखली. एबी डिव्हिलियर्सने पंजाबच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ४४ चेंडूत ८२ धावा चोपून काढल्या. त्याला स्टॉयनिसने नाबाद ४६ धावा करुन चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी १२१ धावांची भागिदारी रचत आरसीबीला २०२ धावांपर्यंत पोहचवले.