Thu, Aug 22, 2019 14:43होमपेज › Sports › IPL : वॉट्सनच्या तडाखेबाज खेळीमुळे सीएसके पॉईंट टेबलमध्ये अव्वल

IPL : वॉट्सनच्या तडाखेबाज खेळीमुळे सीएसके पॉईंट टेबलमध्ये अव्वल

Published On: Apr 23 2019 8:14PM | Last Updated: Apr 23 2019 11:39PM
चेन्नई : पुढारी ऑनलाईन 

हैदराबादने ठेलवलेल्या १७५ धावांचे आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने दमदार सुरुवात केली. शेन वॉट्सन आणि सुरेश रैनाने ८ षटकात ६८ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी या दोघांनी ७७ धावांची भागिदारी केली. पण, रैना आक्रमक खेळण्याच्या नादात ३८ धावांवर बाद झाला. रैना बाद झाल्यानंतर वॉट्सनने धुवाधार फलंदाजी करत आपल्या शतकाकडे कूच केली. पण, शतकासाठी अवघ्या ४ धावांची गरज असताना त्याला भुवनेश्वरने बाद केले. त्याने ५३ चेंडूत ६ षटकार आणि ९ चौकार मारत ९६ धावा केल्याा. त्याने रायडूला हाताशी धरुन तिसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागिदारी रचली. 

वॉट्सन बाद झाल्यानंतर हैदराबादच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत सामना अंतिम षटकापर्यंत नेला. पण, अखेर केदारने १ चेंडू शिल्लक असताना विजयी धाव पूर्ण केली. या विजयाबरोबरच चेन्नईचे १६ गुण झाले आहेत. त्यामुळे काल दुसऱ्या स्थानावर गेलेली चेन्नई आज पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे. 

 तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या चेन्नईने दुसऱ्याच षटकात बेअरस्टोला बाद करत हैदराबादला पहिला धक्का दिला. संघात परतलेल्या हरभजनने बेअरस्टोला भोपळाही फोडू दिला नाही. पण, त्यानंतर वॉर्नर आणि मनिष पांडेने हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन दिली. या दोघांनी पॉवर प्लेमध्येच संघाचे अर्धशतक धावफलकावर लावले. मनिष पांडेनेही आपले २५ चेंडूत आक्रमक अर्धशतक पूर्ण केले. पाठोपाठ वॉर्नरने यंदाच्या आयपीएलमधील आपले ७ वे अर्धशतक पूर्ण केले.

पांडे आणि वॉर्नरने दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागिदारी रचली. पण, अर्धशतकानंतर वॉर्नर लगेचच बाद झाला. त्यानंतर मनिष पांड्याने आक्रमक फलंदाजी करत ४९ चेंडूत ८३ धावा केल्या. त्याला २६ धावा करुन विजय शंकरने चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागदारी केली. त्यामुळे हैदराबादने चेन्नईसमोर १७५  धावांचे टार्गेट उभारले.