Sat, Mar 23, 2019 00:15होमपेज › Sports › आयपीएलमुळे क्रिकेटचे नुकसान : माईक अथर्टन

आयपीएलमुळे क्रिकेटचे नुकसान : माईक अथर्टन

Published On: Jul 13 2018 12:47AM | Last Updated: Jul 13 2018 12:46AMलंडन : वृत्तसंस्था

आयपीएलसारख्या झटपट मनोरंजन देणार्‍या प्रकारामुळे क्रिकेटच्या मूळ स्वरूपाला धक्‍का बसला आहे, येथे पुढील काळात कसोटी क्रिकेटला प्रेक्षक मिळणे कठीण होईल, असे मत इंग्लंडचे माजी कर्णधार माईक अथर्टन यांनी व्यक्‍त केले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या पुस्तक प्रकाशनादरम्यान आथर्टन यांनी हे वक्‍तव्य केले आहे.

माझ्या मते, इतर गोष्टींप्रमाणे क्रिकेटही उद्ध्वस्त झालेले आहे. प्रत्येक खेळाडूला विविध पर्याय उपलब्ध करून देत आयपीएलने क्रिकेटची पूर्णपणे वाट लावली आहे. टी-20 क्रिकेटच्या तुलनेत कसोटी क्रिकेटच्या भविष्याबद्दल प्रश्‍न विचारला असताना अथर्टन यांनी आपले मत मांडले आहे. या कार्यक्रमादरम्यान इंग्लंडचे माजी खेळाडू माईक गॅटिंग आणि श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकारा हेदेखील उपस्थित होते.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेटला अजूनही भवितव्य आहे. भारतात तुम्हाला कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांची उपस्थिती कदाचित लाभणार नाही; मात्र कसोटी क्रिकेटने आतापर्यंत प्रत्येक वेळा नवीन बदल आत्मसात केले आहेत. त्यामुळे भविष्यकाळासाठी मी सकारात्मक आहे. अथर्टन यांनी आपली बाजू मांडली. दिवस-रात्र कसोटी सामने हा कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी पर्याय ठरू शकतो का, असा प्रश्‍न विचारला असता, प्रत्येक काम करणार्‍या माणसाला आपला वेळ दिवस-रात्र कसोटी सामना पाहण्यासाठी देता येईल याची खात्री देता येत नाही, असे अथर्टन म्हणाले.