हॅमिल्टन : पुढारी ऑनालईन
तिसऱ्या आणि अंतिम टी20 सामन्यात किवींनी भारताचा 4 धावांनी पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने किवींनी टी20 मालिका 2-1 ने जिंकली. न्यूझीलंडने निर्धारित 20 षटकात दिलेल्या 212 धावांचा पाठलाग करताना भारताला 6 बाद 208 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडचा 72 (40 चेंडू) धावांची तुफानी खेळी करणारा कोलिन मुन्रो सामनावीर तर यष्टीरक्षक फलंदाज टीम सैफर्ट मालिकावीर ठरला.
तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारत आणि किवींमध्ये पहिल्या दोन सामन्यात 1-1 बरोबरी झाली होती. आज अंतिम आणि निर्णायक सामना हॅमिल्टन येथे झाला. भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. किवींनी दिलेल्या 212 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. पहिल्या षटकातच 5 धावा करून सलामीवीर शिखर धवन बाद झाला.
तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी आलेल्या विजय शंकरने 28 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकार खेचत तुफानी 43 धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्माच्या साथीने 75 धावांची भागिदारी केली. सँटनरच्या गोलंदाजीवर शंकर झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने 12 चेंडूत 1 चौकार 3 षटकारांसह 28 धावांची वादळी खेळी केली. पंत बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या हार्दिक पांड्याने षटकारानेच सुरुवात केली. संघ मजबूत स्थितीत असतानाच सुरुवातीपासून संयमी खेळणारा कर्णधार रोहित शर्मा 32 चेंडूत 38 धावा करून परतला.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ हार्दिक पांड्याही 11 चेंडूत 21 धावा करून परतला. 300 वा टी20 सामना खेळणाऱ्या धोनीलाही कमाल दाखवता आली नाही. धोनी 2 (4 चेंडू) धावांवर परतला. त्यामुळे मजबूत स्थितीत असणारा भारत एकामागून एक 3 गडी बाद झाल्याने बॅकफूटवर गेला. धोनी बाद झाला तेव्हा भारताला विजयासाठी 28 चेंडूत 68 धावांची गरज होती.
भारताची पडझड होत असतानाच दिनेश कार्तिक आणि क्रुणाल पांड्या यांनी भारताचा डाव सावरला. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 16 धावांपर्यंत अशा स्थितीत आणले. परंतु साउथीचे शेवटचे षटक भारतासाठी निराशाजनक ठरले. त्यात कार्तिकचा तिसऱ्या चेंडूवर धाव न काढण्याचा निर्णय धक्कादायक ठरला. शेवटच्या षटकात 11 धावाच मिळाल्या. कार्तिकने 16 चेंडूत चार षटकारांसह 33 धावा केल्या. तर क्रुणालने 13 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 26 धावांची खेळी केली.
दरम्यान, पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व राखत 80 धावांची भागीदारी केली. धोनीच्या कमालीच्या यष्टीरक्षणाचा टीम सैफर्ट बळी ठरला. सैफर्ट 25 चेंडूत 43 धावा करून परतला. तर कोलिन मन्रोने चौफेर धुलाई करत 40 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकार खेचत 72 धावांची खेळी साकारली. खलील अहमदने हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर झेल सोडून त्याला जीवदान दिले. परंतु, लवकरच कुलदीप यादवने त्याला हार्दिककडे झेल देण्यास भाग पाडले.
त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यमसनने 27 धावांची खेळी केली. त्याला खलील अहमदने 15 व्या षटकात बाद केले. भूवनेश्वरने कोलिन दि ग्रँडहोमचा (30) अडथळा दूर केला. डेरेल मिशेल (19) आणि रॉस टेलर (14) धावांवर नाबाद राहिले.
भारताकडून कुलदीप यादवने 4 षटकांत 26 धावा देत 2 बळी घेतले. खलील अहमद आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक बळी टिपला. गतवेळी 3 बळी घेण्याची कामगिरी करणाऱ्या क्रुणालला कमाल दाखवता आली नाही. किवी फलंदाजांनी त्याच्यावर वर्चस्व राखत 4 षटकात 54 धावा कुटल्या. निर्धारित 20 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात किवी संघाने 212 धावा केल्या.