टी-२० वर्ल्डकपसाठी आयसीसीची सावध भूमिका

Last Updated: May 29 2020 8:43AM
Responsive image


नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) बोर्डाच्या बैठकीत ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप सह इतर सर्व मुद्द्यांवरचा निर्णय 10 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. गुरुवारी आयसीसी बोर्डाची  टेलिकॉन्फरन्सच्या माध्यमातून एक महत्त्वाची बैठक झाली. ज्यामध्ये या मुद्यांवर 10 जूनला निर्णय घेण्याबाबत म्हटले गेले.

टी 20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान होणार होते. पण, कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा स्थगित करून त्या कार्यक्रमात इंडियन प्रिमियर लीग ( आयपीएल) स्पर्धा आयोजित केले जाईल अशी चर्चा रंगली होती. आयसीसी बोर्डाने सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे सतत बदलत असलेल्या स्थितीकडे पाहता वेगवेगळ्या आपत्कालीन पर्यायाना घेऊन संबंधित हितधारकांसोबत चर्चा सुरू ठेवण्याचा आग्रह आयसीसी व्यवस्थापनाला करण्यात आला आहे.

या बैठकीत ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 विश्वचषक 2022 पर्यंत स्थगित करण्याची घोषणा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण, तसे झाले नाही. ऑस्ट्रेलियाने आपले आगामी क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाचा दौरा कसा असेल, हे त्यांनी सांगितले आहे. पण विश्वचषकाबाबत मात्र त्यांनी ठोस असे पाऊल उचलेले दिसत नाही. काही वृत्तांनुसार ऑस्ट्रेलिया विश्वचषक खेळवण्यात उत्सुक नसल्याचेही समजत होते.