Mon, Nov 20, 2017 17:21होमपेज › Sports › ...तो विचार स्वप्नातही केला नव्हता!

...तो विचार स्वप्नातही केला नव्हता!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लंडन : वृत्तसंस्था 

आठव्यांदा विम्बल्डनचे अजिंक्यपद पटकवीन असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता आणि एका वर्षात तू दोन ग्रँडस्लॅम जिंकशील असे कोणी म्हटले असते तर तो माझ्यासाठी मोठा विनोद होता, अशी कबुली स्विस मास्टर रॉजर फेडररने दिली आहे.  येत्या काही दिवसांत 36 व्या वर्षात पदार्पण करणार्‍या फेडररने मरिन सिलीचवर 6-3, 6-1 आणि 6-4 असा सहज विजय साजरा करून यंदाच्या विम्बल्डनवर आपले नाव कोरले. वर्षातील ही तिसरी आणि सर्वात प्रतिष्ठेची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर फेडररने मोकळेपणे आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

बरोबर 16 वर्षांपूर्वी फेडररने विम्बल्डनमध्येच त्यावेळेचा दिग्गज पीट सॅम्प्रासचा पराभव करून नवा स्टार उदयाला येत असल्याचे संकेत दिले होते; मात्र पहिले विम्बल्डन अजिंक्यपद त्याने 2003 साली पटकावले. आता फेडररची एकूण 19 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे झाली असून, एकेकाळचा कट्टर प्रतिस्पर्धी राफेल नदालपेक्षा त्याच्याकडे चार ग्रँडस्लॅम जास्त आहेत. या वर्षी जानेवारीत त्याने ऑस्ट्रेलियन ओपनच्या रूपाने कारकीर्दीतील 18 वे ग्रँडस्लॅम पटकावले होते.

‘सॅम्प्रासला मी जेव्हा प्रथम पराभूत केले तेव्हा मी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न पाहिले होते; मात्र आठ अजिंक्यपदे पटकावण्याचे लक्ष्य मी कधीच ठेवले नाही. आता जर मी आठव्यांदाच चॅम्पियन झालो आहे, तर याचे श्रेय माझे पालक, प्रशिक्षक यांनाच जाते. कारण, या वयातही त्यांनी मला खेळण्याची प्रेरणा दिली, अशी प्रांजळ कबुलीही फेडररने दिली. 

गेल्या वर्षी फेडरर विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये पराभूत झाला होता. त्यानंतर त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीनेही डोके वर काढले होते. त्यामुळे 2016 साली त्याला एकही ग्रँडस्लॅम जिंकता आली नाही. फेडररच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच असे घडले होते; मात्र यातूनही तो बाहेर आला आणि यंदा ऑस्ट्रेलियन ओपनसह इंडियन वेल्स, मियामी येथील स्पर्धा जिंकली. 

‘हे वर्ष इतके चांगले गेले असल्याने माझे मलाच खूप आश्‍चर्य वाटते आहे. या भावना शब्दांत व्यक्‍त करणे कठीण आहे. या वर्षी मी दोन ग्रँडस्लॅम जिंकणार आहे, असे जर मी सांगितले असते तर लोकांचा विश्‍वास बसला नसता, असेही त्याने म्हटले आहे.