Thu, Mar 21, 2019 09:00होमपेज › Sports › फिफा २०१८ : फायनल पाहण्याआधी ‘हे’ वाचलेच पाहिजे!  

FIFA: ...तर मिळणार नवा विजेता

Published On: Jul 12 2018 11:40AM | Last Updated: Jul 15 2018 2:29PMमॉस्को : पुढारी ऑनलाईन

गेल्या महिन्याभरापासून जगाला फुटबॉल फिव्हर चढला आहे. रशियात सुरु असलेल्या २१ व्या फिफा विश्वचषक स्पर्धेत अनेक विश्वविक्रम झाले. अर्जेंटीना, पोर्तुगाल या बलाढ्य संघांवर बाद फेरीतूनच बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली. तर तब्बल २० वेळा विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या आणि ५ वेळा विश्वविजेत्या ब्राझीलला उपांत्यपूर्व फेरीत बेल्जियमकडून पराभूत व्हावे लागले. यात फर्नांडीन्होच्या आत्मघाती गोलमुळेच ब्राझीलला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.

उपांत्य फेरीत पराभवामुळे इंग्लंडचे २८ वर्षांनी पुन्हा फायनलमध्ये पोहचण्याचे स्वप्न भंग झाले. त्यांना क्रोऐशियाने २-१ अशा गोलफरकाने पराभूत केले. या विजयासह क्रोएशिया पहिल्यांदाच फिफा फायनलपर्यंत पोहचला आहे. तर फ्रान्स बेल्जियमला नमवून दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. या विश्वचषक स्पर्धेत काही विक्रमावर टाकूयात एक नजर...

फिफाच्या इतिहासात विक्रमी स्वयंगोल

फिफाच्या विश्वचषक स्पर्धेत १९९८ साली सर्वाधिक ६ स्वयंगोल झाले होते. हा विक्रम २० वर्षांनी मोडला. यंदाच्या स्पर्धेत स्वयंगोलने दुहेरी आकडा गाठला. उपांत्य फेरीपर्यंत एकूण ११ स्वयंगोल नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये ट्युनिशियाकडून झालेल्या स्वयंगोलनंतरही त्यांनी विजय मिळवला. मात्र, इतर दहा संघांना स्वयंगोल महागात पडला.

एकाच सामन्यात सर्वाधिक गोल नोंदवण्याचा प्रयत्न बेल्जियम विरुद्ध ट्युनिशिया यांच्यातील लढतीवेळी झाला. या सामन्यात तब्बल ३१ वेळा गोल नोंदवण्याचा प्रयत्न झाला. तसेच या स्पर्धेतील सर्वात जास्त गोलही याच सामन्यात नोंदवले गेले. बेल्जियमने ५ तर ट्युनिशियाने २ गोल केले. 

इंग्लंडचा हॅरी केन ठरणार गोल्डन बूटचा मानकरी?

यंदाच्या फिफा विश्वचषकात सर्वाधिक ६ गोल नोंदवून गोल्डन बूटच्या शर्यतीत इंग्लंडचा हॅरी केन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर बेल्जियमचा लूकाकू आणि रशियाचा डेनिस चेरीशेव हे दोघेही ४ गोलसह दुसऱ्या स्थानावर आहेत. या तिघांचेही संघ फिफातून बाहेर पडले आहेत. तर ३ गोल नोंदवून तिसऱ्या स्थानावर असलेल्या ग्रीजमॅनचा फ्रान्स फायनलमध्ये खेळणार आहे. गोलफरक पाहता ग्रीजमॅनला गोल्डन बूट मिळवणे अशक्य आहे.

फिफा २०१८ च्या विश्वचषकात आतापर्यंत २१० खेळाडूंना यलो कार्ड दाखवण्यात आले. यात सर्वाधिक स्वीत्झर्लंडच्या लार्सनला ३ वेळा यलो कार्ड दाखवले. तर चार जणांना रेड कार्ड देण्यात आले. यात कोलंबिया, रशिया, जर्मनी आणि स्वीत्झर्लंडच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. 

विश्वचषक युरोपातच राहणार

२०१८ ची फायनल फ्रान्स आणि क्रोएशिया या दोन युरोपीय संघांमध्येच होणार असल्याने पुन्हा एकदा विश्वचषक युरोप खंडातच राहणार आहे. २००२ चा वर्ल्डकप ब्राझीलने जिंकला होता. त्यानंतर सलग तीनवेळा युरोपियन संघ वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. २००६ मध्ये जर्मनीत झालेला वर्ल्डकप इटलीने जिंकला होता. २०१० साली नेदरलँडला हरवून स्पेनचा संघ जगज्जेता ठरला होता. २०१४ साली अर्जेंटिनाला हरवून जर्मनी चॅम्पियन झाला होता. 

आतापर्यंत झालेल्या २० विश्वचषक स्पर्धांपैकी ११ वेळा युरोपीय संघ विश्वविजेते बनले आहेत. तर ९ वेळा दक्षिण अमेरिकेतील संघांनी विजेतेपद पटकावले आहे. 

फ्रान्सला दुसऱ्यांदा विजेतेपदाची संधी

फ्रान्सने २० वर्षांनी पुन्हा एकदा विश्वविजेता होण्यापासून एक पाऊल दूर आहे. १९९८ मध्ये फिफाचे यजमानपद फ्रान्सकडे होते. या स्पर्धेत ब्राझीलला हरवून फ्रान्सने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. आता क्रोएशियाला हरवून २० वर्षांनी पुन्हा जगज्जेता बनण्याच्या तयारीत आहे. 


दिदियोर डेश्चॅम्प

फ्रान्सने फिफा विश्वचषक जिंकला तर त्यांचे प्रशिक्षक असलेले दिदियोर डेश्चॅम्प यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंद होणार आहे. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे ते जगातील तिसरे आणि फ्रान्सचे पहिलेच प्रशिक्षक ठरणार आहेत. ते १९९८ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. कर्णधार म्हणूने देशाला जगज्जेता बनवल्यानंतर आता प्रशिक्षक म्हणून त्यांनी फ्रान्सला अंतिम फेरीपर्यंत पोहचवले आहे.

 

...तर मिळणार नवा विजेता

फायनलमध्ये जर क्रोएशियाने फ्रान्सला पराभूत केले तर नवा विश्वविजेता मिळणार आहे. क्रोएशिया फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचला आहे. क्रोएशियाचा विजय झाल्यास फिफाला नवा विजेता मिळणार आहे. १९९८ ला जगज्जेत्या ब्राझीलला हारवून फ्रान्सने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर २००२ ला जर्मनीला पराभूत करत ब्राझीलने फिफा विश्वचषक जिंकला. त्यानंतर २००६ ला इटलीने विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. २०१०च्या विश्वचषकात स्पेनने पहिल्यांदाच विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. गेल्या फिफा विश्वचषकात मेस्सीच्या अर्जेंटीनाला धक्का देत जर्मनी जगज्जेता बनली होती. मात्र यंदा त्यांना बाद फेरीतूनच बाहेर पडावे लागले. आता क्रोएशिया पहिल्यांदाच फिफा फायनल खेळणार आहे त्यामुळे त्यांनी विश्वचषक जिंकल्यास फुटबॉल जगताला नवा सम्राट मिळणार आहे.

Tags : fifa2018, final, croetia, france, russia, FIFA, Worldcup, record, highlights, golden shoes,