इंग्लंडची मालिकेत बरोबरी

Last Updated: Nov 09 2019 2:07AM
Responsive image


नेपियर : वृत्तसंस्था

न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने 76 धावांनी विजय मिळवून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. डेव्हिड मलानने केलेले तुफानी शतक आणि त्याला मॉर्गनची मिळालेली साथ यामुळे इंग्लंडने 20 षटकांत 3 बाद 241 धावा चोपल्या. त्यास प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडच्या संघाला 165 धावांपर्यंतच मजल मारता आली.

या सामन्यात मलानने शानदार शतक करीत इंग्लंडसाठी विक्रमाची नोंद केली. इंग्लंडकडून टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम त्याने केला. मलानने 48 चेंडूंत 101 धावांचा टप्पा गाठला. त्याने इंग्लंडच्या अ‍ॅलेक्स हेल्सचा विक्रम मोडला. इंग्लंडकडून टी-20 मध्ये पहिले शतक अ‍ॅलेक्स हेल्स याने केले होते. त्याच्यानंतर शतक ठोकणारा मलान हा दुसरा फलंदाज ठरला; पण हेल्सने श्रीलंकेविरुद्ध शतक करण्यासाठी 60 चेंडू खेळले होते. त्यापेक्षा कमी चेंडूंत मलानने शतक झळकावले.

मलानने 51 चेंडूंत नाबाद 103 धावांची खेळी केली. ईश सोढीने टाकलेल्या 17 व्या षटकांत त्याने 28 धावा कुटल्या. इतकेच नाही तर मलान आणि मॉर्गन यांनी इंग्लंडसाठी सर्वाधिक टी-20 भागीदारीचीही नोंद केली. मलान आणि मॉर्गन यांच्यात 183 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडविरुद्ध या सामन्यात मलानने दमदार फलंदाजी केली.

आजच्या सामन्यातील मलानची खेळी खास ठरली कारण न्यूझीलंडचा संघ मालिकेत 2-1 ने पुढे होता. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला असता तर इंग्लंडचा मालिका पराभव झाला असता. मात्र, मलानच्या खेळीने इंग्लंडने मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. मॉर्गनचे शतक हुकले; पण त्यानेही दमदार 91 धावा केल्या.