Tue, Jul 14, 2020 06:42होमपेज › Sports › इंग्लंडच्या वर्ल्डकप आयोजनावर बंदी घालावी? : शशी थरूर

इंग्लंडच्या वर्ल्डकप आयोजनावर बंदी घालावी? : शशी थरूर

Published On: Jun 13 2019 4:37PM | Last Updated: Jun 13 2019 4:37PM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताने आपल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ३६ धावांनी पराभव केल्यानंतर भारतीय चाहत्यांना १३ जूनला न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या सामन्याचे वेध लागले होते. पण, या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सर्वच चाहत्यांची निराशा झाली. वर्ल्डकपच्या आता पर्यंत झालेल्या १७ सामन्यातील तीन सामने पावासामुळे रद्द करावे लागले आहेत. त्यामुळे इंग्लंडमधील या लहरी वातावरणाचा क्रिकेट फॅन्सना वैताग आला आहे. 

अशाच वैतागलेल्या एका फॅन पैकी एक आहेत काँग्रेसचे खासदार शशी थरूर. त्यांनी ट्विट करून इंग्लंडला वर्ल्डकप सामन्यांचे आयोजन करण्यास मनाई करावी अशी मागणी केली आहे. त्यांनी ‘आतापर्यंत तीन सामने वॉश आऊट झाले आहेत. या आठवड्यात अजूनही काही सामने पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. यामुळे वर्ल्डकप २०१९ हा फुसका बार ठरत आहे. जागतिक हवामान बदलाचा विषय जोपर्यंत सुटत नाही किंवा एमसीसी छत असलेले मैदान तयार करत नाही तोपर्यंत इंग्लंडला क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यास बंदी घालावी का? इंग्लंडचा उन्हाळा झपाट्याने पावसाळ्यात बदलत आहे.’ असे ट्विट करुन आपली पावासमुळे रद्द झालेल्या सामन्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. 

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होत असेल्या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावल्याने नाणेफेकही झाली नाही. पावसामुळे सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक एक गुण दिला जोतो. यामुळे स्पर्धेच्या शेवटाला गुणतालिकेत हा पाऊस चांगलाच गोंधळ निर्माण करण्याची शक्यता आहे.