Tue, Jun 25, 2019 15:22होमपेज › Sports › पुजारा तारणहार

पुजारा तारणहार

Published On: Dec 07 2018 1:51AM | Last Updated: Dec 06 2018 9:09PM
अ‍ॅडलेड : वृत्तसंस्था

‘मायदेशातील शेर परदेशात ढेर होतात,’ ही भारतीय संघाची परंपरा ऑस्ट्रेलियामध्येही सुरू राहिली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित मालिकेत भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी अवघ्या 86 धावांत निम्मा संघ माघारी परतला असताना चेतेश्‍वर पुजाराने 123 धावांची झुंजार खेळी करून लाज वाचवली. दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 9 बाद 250 धावा झाल्या होत्या.  

पहिल्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिला 1 तास बॉल स्विंग होत असतो. त्यामुळे भारताला सावध सुरुवातीची गरज होती. परंतु, भारताने या महत्त्वपूर्ण पहिल्या तासातच आघाडीचे तीन फलंदाज गमावले. भारताच्या अवघ्या 3 धावा झालेल्या असताना तो दुसर्‍याच षटकात हेझलवूडच्या गोलंदाजीवर फिंचकडे झेल देऊन परतला. त्या पाठोपाठ भारताचा दुसरा सलामीवीर ‘सराव’ सामन्यातील शतकवीर मुरली विजयही 11 धावा करीत पॅव्हेलियनमध्ये पोहोचला. विराटलाही काही खास करता आले नाही. त्यानेही 3 धावा करीत परतीची वाट धरली. त्यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे (13) हेझलवूडचा बाहेर जाणारा चेंडू फटकावण्याच्या नादात बाद झाला आणि भारताला चौथा धक्‍का बसला. अजिंक्यने 31 चेंडूत 13 धावा केल्या. अजिंक्यनंतर आलेल्या रोहितने पुजाराच्या साथीने भारताची पडझड उपहारापर्यंत रोखली. 

उपहारानंतर रोहितने भारताची धावगती वाढवण्यास सुरुवात केली. त्याने काही आकर्षक फटके मारले. भारताची धावगती वाढत होती. रोहितला एका बाजूने पुजाराने सावध फलंदाजी करीत चांगली साथ दिली होती; पण नॅथन लियॉनला एक षटकार खेचल्यानंतर रोहितचे मन भरले नाही आणि त्याने त्याला दुसराही षटकार मारण्याचा प्रयत्न केला व हा प्रयत्न फसला. रोहित 3 षटकार आणि 2 चौकारांसह 37 धावा करून बाद झाला. रोहित सेट होऊन बाद झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. 86 धावांवर 5 फलंदाज माघारी गेल्यानंतर पंत मैदानावर आला. त्याची सुरुवातही अडखळत झाली; पण नंतर त्यानेही आक्रमक पवित्रा घेत धावा वाढण्यास सुरुवात केली. त्याने 1 षटकार 2 चौकार ठोकत 25 धावा केल्या. परंतु, तोही लियॉनच्या फिरकीत अडकला आणि भारताला 6 वा धक्‍का बसला. 

दरम्यान, सावध फलंदाजी करणारा चेतेश्‍वर पुजारा आपल्या अर्धशतकाजवळ पोहोचला होता. त्याच्या सावध फलंदाजीमुळेच भारताने आपली शंभरी पार केली. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा भारताच्या 56 षटकांत 6 बाद 146 धावा झाल्या होत्या. 

चहापानानंतर पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतकानंतर पुजाराने आपली धावगती वाढवली. त्याच्या साथीला आलेल्या अश्‍विनने त्याला धावपट्टीवर थांबून साथ दिली. दोघेही भारताला 200 चा टप्पा पार करून देतील, असे वाटत असतानाच अश्‍विन कमिन्सच्या गोलंदाजीवर झेल देऊन परतला. अश्‍विन बाद झाल्यामुळे आता फक्‍त तळातील फलंदाज राहिले होते. दरम्यान, भारताने आपला 200 धावांचा टप्पा पार केला. त्यानंतर चेतेश्‍वर पुजाराने डावाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने आपल्याकडेच स्ट्राईक ठेवत भारताच्या धावसंख्येत भर घालण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्याने आपले कसोटीतील 16 वे शतक पूर्ण केले. त्याच्या या झुंजार शतकी खेळीने भारत 250 धावांच्या जवळ पोहोचला. याचबरोबर पुजाराने कसोटीतील आपल्या 5 हजार धावाही पूर्ण केल्या. भारताने 250 धावांचा टप्पा पार केल्यानंतर अखेर पुजाराच्या झुंजार शतकी खेळीचा अंत झाला. तो 246 चेंडूत 123 धावा करून तो धावबाद झाला. याचबरोबर पहिल्या दिवसाचा खेळ संपला. त्यावेळी भारताच्या 9 बाद 250 धावा झाल्या होत्या. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी सामूहिक कामगिरी केली. स्टार्क, कमिन्स, हेझलवूड आणि लियॉनने प्रत्येकी दोन बळी टिपले.