Fri, Jul 19, 2019 22:42होमपेज › Sports › भारतासमोर कॅनडाचे आव्हान 

भारतासमोर कॅनडाचे आव्हान 

Published On: Dec 07 2018 9:42PM | Last Updated: Dec 07 2018 9:42PM
भुवनेश्‍वर : वृत्तसंस्था 

हॉकी विश्‍वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाची चांगली कामगिरी सुरूच आहे. सध्या भारतीय संघ ‘क’ गटात चार गुणांसह अव्वल स्थानी आहे. दुसरीकडे ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमचा संघ हा चार गुणांसह दुसर्‍या स्थानी आहे; पण भारतीय संघ चांगल्या गोल फरकाने आघाडीवर आहे. शनिवारी जेव्हा भारतीय संघ कॅनडाचा सामना करेल तेव्हा संघाचा प्रयत्न उपांत्यपुर्व फेरीतील आपली जागा निश्‍चित करण्याचा असेल. कॅनडाला अंतिम आठमध्ये जागा मिळवायची झाल्यास बेल्जियम व दक्षिण आफ्रिका यांना मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल. भारताची गोल सरासरी प्लस पाच व बेल्जियमची प्लस एक आहे. कॅनडा व दक्षिण आफ्रिका यांचे दोन सामन्यांत एक-एक गुण आहेत.

भारताचे पारडे जड 

भारताने पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5-0 असा विजय मिळवला. तर, बेल्जियमसोबत सामना 2-2 असा बरोबरीत राखला. कॅनडाला बेल्जियमकडून 2-1 असे पराभूत व्हावे लागले. तर, कॅनडा व दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत संपला. गटात अजूनही सर्वच संघांना पुढच्या फेरीत पोहोचण्याची संधी आहे; पण यजमानांचा प्रयत्न अंतिम आठ फेरीत आपले स्थान निश्‍चित करण्याचे असेल. या सामन्यात संघाचा फॉर्म पाहता भारताचे पारडे जड आहे; पण गुरुवारी जागतिक क्रमवारीत 20 व्या स्थानी असलेल्या फ्रान्सने ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाला नमविले. त्यामुळे उलटफेराची शक्यता नाकारता येत नाही.