Tue, Nov 19, 2019 13:00होमपेज › Sports › भुवनेश्‍वर तंदुरुस्तीकडे

भुवनेश्‍वर तंदुरुस्तीकडे

Published On: Jun 26 2019 1:59AM | Last Updated: Jun 26 2019 1:59AM
मँचेस्टर : वृत्तसंस्था

गुरुवारी वेस्ट इंडिजचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार मंगळवारी इनडोअर नेटस्मध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसला. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भुवीची दुखापत लक्षात घेता नेटस्मध्ये गोलंदाजी करण्यासाठी बीसीसीआयने नवदीप सैनीला बोलावून घेतले होते; पण आता भुवीलाच गोलंदाजी करताना पाहिल्यानंतर चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची आस लागली आहे. भारताचा पुढील सामना उद्या वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. मात्र, या सामन्यात त्याला खेळवण्याची जोखीम संघ व्यवस्थापन घेणार नाही, असे वाटते.

भुवनेश्‍वर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दुखापतीमुळे माघारी परतला होता; पण त्याची दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे भुवनेश्‍वर कुमारला या सामन्याला मुकावे लागले होते. भुवनेश्‍वरने दुखापतीपूर्वी 2.4 षटके टाकली होती. त्यानंतर त्याचे उर्वरित दोन चेंडू विजय शंकरने टाकले होते. त्यानंतर भुवी परतलाच नाही. भारतीय संघ गुरुवारी वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानेही कंबर कसली आहे; पण मंगळवारी भारताच्या सराव सत्रावर पावसाने पाणी फिरवले. त्यामुळे संघाने इनडोअर सराव केला. यात भुवनेश्‍वरने सहभाग घेतला. संघाचे फिजिओ पॅट्रिक त्याच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्याला सूचना देत होते. मंगळवारी येथे पाऊस पडला असला तरी गुरुवारी पाऊस येणार नाही, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.